देशभरात पावसाचे थैमान८ सप्टेंबरपर्यंत जोर कायम

नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले असून आंध्र् प्रदेश व गुजरातमधील पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीनाल्यांना पूर आले असून अनेक शहरांमध्येही पाणी साचले आहे. हवामान विभागाने उद्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड व उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.गुजरातमध्ये पुढील आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता असून काल गुजरातमधील कडाणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने मही नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. महीसागर जिल्ह्याला पुराचा इशारा देण्यात आला. छत्तीसगड, बिहारसह १९ राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विजांचा कडकडासह पाऊस झाला. गुजरातव्यितरिक्त आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि त्रिपुरामध्ये पावसाने हाहाकार माजवला असून गेल्या आठवडाभरातील पावसाने ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशात १७, तेलंगणामध्ये १६ तर त्रिपुरात ३१ जणांचा मृत्यू झाला. पुरामुळे या राज्यांतील ७२ हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. हिमाचल प्रदेशात पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले. मध्य प्रदेशातील ५ जिल्ह्यांसह झाबुआ, रतलाम, मंदसौर, दिंडोरी, सिवनी, बालाघाट जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांसह जोधपूर आणि बिकानेर भागात जोरदार पाऊस झाला. हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. हिस्सारमधील पावसाने गेल्या सहा वर्षांचा अतिवृष्टीचा विक्रम मोडला. देशात ८ सप्टेंबरपर्यंत मान्सून सक्रिय राहणार असून त्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top