म्हापसा – उत्तर गोवा जिल्ह्यातील म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर संस्थानतर्फे देवस्थान प्रशासकांना सादर केलेल्या महाजन यादीत नवीन समाविष्ट केलेल्या २५४ नावांना काही महाजनांनी आक्षेप घेतला आहे. देवस्थानच्या कार्यकारी मंडळाच्या मान्यतेविना ही नावे शेवटच्या क्षणी आणि बेकायदेशीररीत्या महाजनांच्या अंतिम यादीत घुसवली गेल्याचा दावा करत ही नावे रद्दबातल करण्यात यावी आणि सुधारित यादी सादर करावी अशी मागणी संतोष बेळेकर व इतर महाजनांनी देवस्थानचे अध्यक्ष तसेच देवालय प्रशासकांकडे केली आहे.
गेल्या २१ जानेवारी रोजी देवालय प्रशासक तथा मामलेदारांना येत्या ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी मंडळाने २३५८ महाजनांची यादी सादर केली होती. त्यापूर्वी कार्यकारी मंडळाने ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत महाजनांच्या सदस्यपदाचे नूतनीकरण केले होते. त्यावेळी या अंतिम यादीत अनुक्रमे २१०४ नावे होती. मात्र त्यानंतर देवस्थानच्या कार्यकारी मंडळाचे सचिव व इतर पदाधिकाऱ्यांनी संगनमताने, फसवणूक करून तसेच व्यवस्थापकीय कार्यकारी समितीची बैठक घेऊन वैध ठराव न घेता आणि केवळ निवडणुकीत विजय मिळवण्याच्या उद्देशाने ही अतिरिक्त २५४ नवीन नावे चुकीच्या पद्धतीने महाजन यादीत जोडली गेली आहेत, असा आरोप या हरकत पत्रात तक्रारदार महाजनांनी केला आहे.
त्यानंतर २७ रोजी श्री देव बोडगेश्वर देवस्थानच्या कार्यकारी मंडळ समितीची बैठक झाली. या बैठकीचा अहवाल त्याच दिवशी देवस्थान समितीतर्फे प्रशासकांना सादर करण्यात आला. हा अहवाल व वरील तक्रारीच्या आधारे प्रशासकांनी ४ फेब्रुवारीपर्यंत नवीन यादी सादर करण्याची सूचना देवस्थानच्या कार्यकारी मंडळाला केली आहे.