मुंबई – महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी उद्या आझाद मैदानावर होईल हे जाहीर झाले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार हे आज त्यांनीच उताविळपणे जाहीर केले. पण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसल्याने ते सत्तेबाहेर राहतील अशी शक्यता आहे. उद्या सायंकाळी 5.30 वाजता आझाद मैदानावर होणार्या शपथविधी वेळीच हे गूढ उकलणार आहे. तूर्त एकनाथ शिंदे यांचे याबाबत मौन सुरू आहे.
आज भाजपा आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाचा नेता म्हणून निवड केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील. उद्या फक्त मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे. आज सत्तास्थापनेसाठी वेगवान घडामोडी घडल्या. देवेंद्र फडणवीस यांची सकाळी गटनेता म्हणून निवड झाली. त्यानंतर गेले दोन दिवस दिल्ली मुक्कामी असलेले अजित पवार दुपारी मुंबईत परतले. ते परतताच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वर्षावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर तिघे नेते राज्यपालांकडे गेले आणि त्यांनी सत्तास्थापनेचा
दावा केला. आज झालेल्या भाजपा कोअर कमिटी बैठक आणि भाजपा विधिमंडळ पक्ष बैठकीत भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. या बैठकीत भाजपाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन विशेष उपस्थित होते. यानंतर विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपाच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक पार पडली. यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. याला पंकजा मुंडे, आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांनी एकमताने अनुमोदन दिले आणि फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीदरम्यान चंद्रशेखर बावनकुळे, विजय रुपाणी यांच्यासह निर्मला सीतारामण यांनी मनोगत मांडत उपस्थित नेत्यांना संबोधित केले.
यावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली. या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी दिलेल्या ‘एक है तो सेफ है’ च्या नार्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. राज्यातील काँग्रेसच्या काळातील सरकारमध्ये जनतेचे कसे नुकसान झाले हे लोकांना दाखवून आपल्याला पुढे जायचे आहे, काँग्रेसचे सरकार आले नसते तर बुलेट ट्रेन याआधीच सुरू झाली असती असे म्हणत त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या अडीच वर्षांतील कारभारावर टीका केली. तर गटनेता निवडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना म्हटले की, 2019 साली जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता, दुर्दैवाने तो कौल हिसकावून घेत जनतेशी बेईमानी केली होती. सुरुवातीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात आपल्या आमदारांना त्रास दिला गेला. तरीही एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. आम्ही एकत्र राहिलो.
प्रचंड विजय मिळाला. म्हणूनच ‘एक है तो सेफ है’ आणि ‘मोदी है तो मुमकीन है!’ नेतेपदी निवड झाल्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर राजभवनावर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेत 234 आमदारांच्या वतीने सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. फडणवीस म्हणाले की, महायुतीकडून राज्यपालांना पत्र दिले आहे, नवीन सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला आहे. राज्यपालांनी आम्हाला उद्या 5 वाजताची वेळ शपथविधीसाठी दिली आहे. राज्यपालांना महायुतीतल्या घटक पक्षांच्या सहीचे पत्र दिले आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि अजित पवार यांनी देखील माझ्या समर्थनार्थ पत्र दिले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. हा शपथविधी सोहळा पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित असणार आहेत. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद आमच्यासाठी तांत्रिक बाब आहे, आतापर्यंत आम्ही तिघे मिळून निर्णय घेत आलो आहोत. मी काल एकनाथ शिंदेंना भेटून त्यांना विनंती केली की, शिवसेनेच्या वतीने त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर राहावे. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळेल अशी मला आशा आहे. त्यामुळे आम्ही तिघे व आमच्या पक्षाचे इतर नेते, मित्रपक्ष असे मिळून चांगले सरकार महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करू. गेले अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदेंना नव्या सरकारमध्ये नेमके कोणते स्थान मिळणार? याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होतील की नाही याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे.
एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले की, मला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय देणार, यासाठी महायुतीने काम केले. याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून मला पाठिंबा दिला, त्याच ठिकाणी आम्ही फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला आहे. आज खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन करण्याचा आनंद आहे. अजित पवार म्हणाले की, आपण दिल्लीला कोणालाही भेटायला गेलो नव्हतो. मी माझ्या कामासाठी गेलो होतो. या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार आपल्या सहकार्यांसह निघून गेले. मात्र देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले.
अजितदादांना शपथ घेण्याचा अनुभव
मुख्यमंत्र्यांसह तुम्हीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी म्हटले की, थोडे थांबा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. यावर अजित पवार म्हणाले, थोडी कळ काढा, त्यांचे संध्याकाळी समजेल, मी मात्र उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. मी थांबणार नाही. अजित पवारांच्या या वक्तव्यावर शिंदे यांनी मिश्किल टिप्पणी करत म्हटले की, अजितदादांना सकाळ-संध्याकाळ शपथ घेण्याचा अनुभव आहे. या वाक्याने पत्रकार परिषदेमध्ये हास्यकल्लोळ झाला.
शिंदेंचा फडणवीसांशी अबोला
सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर पोहोचले. त्यावेळी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शेजारी बसले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस हे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या मध्ये बसले होते. राजभवनावर पत्र देण्यासाठी राज्यपालांची प्रतीक्षा होत होती. त्यावेळी अजित पवार आणि फडणवीस अधूनमधून एकमेकांशी बोलत होते. मात्र शेजारी बसलेले शिंदे आणि फडणवीस एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत. शिंदेंचा फडणवीसांशी हा अबोला सर्वांना जाणवला. त्याविषयी दबक्या आवाजात राजभवनाच्या आवारात चर्चा सुरू होती.