मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याच्या विविध भागात मोठा जल्लोष करण्यात आला. मुंबईच्या भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून व महिलांनी फुगड्या घालून आनंद साजरा केला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी उत्स्फुर्तपणे लाडूंचे वाटप केले.
रत्नागिरीत प्रमोद महाजन क्रिडा संकुलातील भाजपा जिल्हाकार्यालयाजवळ मोठा जल्लोष केला. धुळे जिल्ह्यात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून आनंद साजरा केला. यावेळी धुळ्याच्या झाशी राणी चौकात फटाके फोडून फडणवीसांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. अमरावती शहरातही रवी राणा यांच्यावतीने फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. पालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड, सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर अशा सर्वच शहरांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल चौकाचौकात फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस नागपुरात येतील तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्याचा मनोदय नागपूरमधील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







