देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाहीच?

मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड यश मिळवून भाजपा हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या निकालानंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून लगेचच जाहीर होईल असे वाटले होते. मात्र 48 तास उलटून गेल्यानंतरही भाजपाच्या गोटात याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. किंबहुना भाजपा आमदारांची एकत्र बैठक घेऊन देवेंद्र फडणवीस यांची गटनेता म्हणून निवड करण्याची पहिली प्रक्रियाही भाजपाने पूर्ण केलेली नाही. यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नाहीत अशी चर्चा आता सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे अध्यक्षपद देऊन केंद्रात अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाईल असे म्हटले जाते.
आज ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेत मुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात होते.
विधानसभेचा निर्णय लागल्यानंतर सर्वपक्षीय विजयी आमदारांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंत्रिपदासाठी या आमदारांच्या हालचालीही सुरू झाल्या. शिंदे गटाने आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलात एकत्र करून गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची अधिकृतपणे निवड केली. अजित पवार यांनीही आपल्या देवगिरी बंगल्यावर आमदारांना बोलावले. या बैठकीत अजित पवार यांची गटनेतेपदी अधिकृतपणे निवड झाली. केवळ भाजपाने अद्याप गटनेत्यांची निवड केलेली नाही. शिंदे गटाच्या आमदारांना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवून यश मिळाले आहे. शिवाय बिहारमध्ये ज्याप्रमाणे नितीशकुमार यांना भाजपाने मुख्यमंत्रिपद दिले त्याप्रमाणेच महाराष्ट्रातही घडावे, असे एकनाथ शिंदेंचे आमदार उघडपणे बोलत आहेत. याला प्रत्युत्तर देताना भाजपाचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले की, प्रत्येक राज्याचे राजकारण वेगळे असते. बिहारमध्ये झाले ते येथे घडणार नाही. दानवे यांनी हे वक्तव्य केले असले तरी मुख्यमंत्री कोण याबाबत त्यांनीही मौन राखले आहे. दुसरीकडे अजित पवार गटाने मात्र जाहीरपणे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला आहे. छगन भुजबळ यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमचा विरोध नाही. जिल्हाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, आमचा नेता अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे, असे आम्हालाही वाटते. पण आमचा वास्तववादी पक्ष आहे. सध्याची आमदारांची संख्या पाहता आमचा मुख्यमंत्री होईल असे वाटत नाही. भाजपा नेता म्हणून ज्याची निवड करील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. एकूणच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, भाजपाचा नवीन नेता उपमुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असे चित्र असू शकते. यात देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील, असे म्हटले जाते. त्यामुळे घवघवीत यश मिळाल्यानंतरही महाराष्ट्राची धुरा कोण वाहणार हे ठरविण्यासाठी काही काळ जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top