बंगळुरू – कर्नाटकातील चिकमंगळूर येथील देवीरम्मा हिल मंदिरात नरक चतुर्दशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेकजण जखमी झाले. काल देवीरम्मा टेकडीवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. हे भक्त भगवान बिंदीगा देवीरामाचे दर्शन घेण्यासाठी तेथे पोहोचले होते.त्यावेळी ही चेंगराचेंगरीची घटना घडली.
देवीरम्मा टेकडीवर वसलेले मंदिर नरक चतुर्दशीच्या दिवशीच उघडते. हे अतिशय पवित्र आणि भाविकांच्या श्रद्धेचे मोठे केंद्र आहे. चिक्कमंगळुरू येथील मल्लेनाहल्ली येथील मंदिर जत्रेला सुरुवात झाल्याने संपूर्ण परिसरात भक्तीची लाट निर्माण झाली आहे. अतूट श्रद्धेने आणि समर्पणाने भाविक खडकाळ आणि काटेरी वाटेवरून अनवाणी चालत येतात. समुद्रसपाटीपासून हे सुमारे ३ हजार फूट उंचीवर आहे. हीच टेकडी चढताना पावसामुळे अनेक जण घसरून पडले,काही जण जखमी झाले.निसरड्या टेकडीवर एकमेकांवर पडून अनेक भाविकांचे हातपाय मोडले.बंगळुरू येथील सिंधू आणि दिव्या यांचा पाय फ्रॅक्चर झाला,तर मंगळुरू येथील जयम्मा यांचा रक्तदाब कमी झाला.तरिकेरे येथील वेणू हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे.