देवनार डम्पिंग ग्राउंडवर
चार मेगावॉट वीजनिर्मिती

मुंबई : – देवनार डम्पिंग ग्राऊंडवर ४ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. या विजेचा वापर कार्यालय, रस्त्यावर असलेल्या विजेसाठी करण्यात येईल. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई महानगरपालिका हद्दीत दररोज ५ हजार कोटी मेट्रिक टन कचरा जमा होतो. जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट देवनार, कांजूर व मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर लावण्यात येते. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. महानगरपालिकेच्या वतीने देवनार येथे ६०० टन प्रतिदिन घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याद्वारे ४ मेगावॅट ऊर्जा निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी आदेश देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन ऑक्टोबर २०२५ मध्ये तो कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. घरगुती घातक कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी ओशिवरा, धारावी आणि मालाड येथे प्रक्रिया केंद्र सुरू केले जाणार आहेत. याव्यतिरिक्त आणखी ८ ठिकाणी अशा स्वरूपाचे केंद्र सुरू केले जाईल. या नवीन आठ केंद्राद्वारे प्रत्येकी दररोज सुमारे ४ टन म्हणजे दररोज एकूण ३२ टन घरगुती घातक कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. या नवीन केंद्रासाठीचे कार्यादेश देखील देण्यात आले असल्याचे संबंधित विभागाच्या अधिका-याने स्पष्ट केले.

Scroll to Top