अहमदनगर : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या दुधाच्या कमी दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलनची घोषणा केली आहे. दूध विकास मंत्र्यांचे आदेश असूनही रास्त भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे शुक्रवारपासून राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बॅनरखाली शेतकरी आणि दुग्ध व्यवसायींनी ‘रास्ता रोको’ मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोहिमेची सुरूवात अहमदनगरच्या राहुरी शहरातून करण्यात येणार आहे. याठिकाणी शेतकरी रास्ता रोको करून दूध रस्त्यावर ओतून सरकार आणि डेअरी कंपन्यांविरोधात आवाज उठवणार आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना दुधाला चांगला भाव मिळेल. यावरही चर्चा न झाल्यास मुंबईत दूधपुरवठा बंद करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. दरम्यान, दुधाला किमान ३४ रुपये प्रतिलिटर दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्याच्या दूध मंत्र्यांनीही एवढा भाव देण्याचे आदेश डेअरी कंपन्यांना दिले होते, मात्र त्याचे पालन होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.