कोल्हापूर- शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन परतत असताना तरुणीचा दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली. या अपघात दुचाकीस्वार तरुणीचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागच्या सीटवर बसलेली तरुणी जखमी झाली.
इव्हेजनील जिरगे (२०)असे मृत तरुणीचे नाव आहे . तर कविता माळी (२४)असे जखमी तरुणीचे नाव आहे.इव्हेजनील , कविता आणि अन्य दोन मैत्रिणी मिरजच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी दोन दुचाकी घेऊन खिद्रापूर कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी काल संध्याकाळी गेल्या होत्या.इव्हेजनील एक दुचाकी चालवत होती.दर्शन घेऊन परतत असताना खिद्रापूर टाकळी मार्गावरील रायनाडे यांच्या शेताजवळ तिचा दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडली.पाठीमागील सीटवर बसलेली कविता रस्त्यावर पडली. तर इव्हेजनील दुचाकीसकट नाल्यात पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला.