दिवा- वसईच्या कामण भागात रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

ठाणे – दिवा-वसई रेल्वे मार्गावरील कामण भागात काल शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास रेल्वेगाडीच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वनविभाग कर्मचार्‍यांनी शवविच्छेदनानंतर त्याचे शव जाळून नष्ट करण्यात आल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांनी दिली.

शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बिबट्याला रेल्वेगाडीने धडक दिल्याची माहिती समजताच वन विभागाच्या अधिकारी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याचा मृतदेह असलेल्या ठिकाणी पंचनामा केला.त्यावेळी बिबट्याचा अपघात झाल्याने त्याचे पाय तुटल्याचे आढळून आले. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही झाला होता. त्याचप्रमाणे या मृत बिबट्याची नखे, दात आणि इतर सर्व अवयव सुस्थितीत आढळून आले आहेत. त्यामुळे हा शिकारीचा प्रकार नसल्याचे स्पष्ट होत आहे. या बिबट्याचा मृतदेह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आला. हा नर बिबट्या असून त्याचे वय सुमारे तीन ते चार वर्षे आहे. हा बिबट्या सी-४५ असल्याची ओळख पटली आहे. तसेच १० जानेवारी २०२२ मध्ये बिबट्याचे छायाचित्र विहार चौकी येथील बसवलेल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top