मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने कानपिचक्या दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या न्यायाधिकरणाकडून आज शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले. यासंदर्भात 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान सुनावणी होणार आहे. त्यानंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होऊन निकालाची तारीख ठरवली जाईल. त्यामुळे आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल दिवाळी सणानंतर लगेच डिसेंबर महिन्यात लागणार आहे.
आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत त्यांना एक आठवड्यात प्रक्रिया सुरू करून वेळापत्रक देण्यास सांगितले होते. त्यानंतर 25 सप्टेंबरला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी झाली होती. या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या, अशी मागणी करण्यात आली होती. प्रत्येक याचिकाकर्त्याला स्वतंत्र पुरावा द्यायचा असल्याने त्याची वेगवेगळी सुनावणी घ्यावी, अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले आहे. याचिकांची एकत्र सुनावणी घ्यायची की स्वतंत्र सुनावणी घ्यायची याचा निकाल 20 ऑक्टोबरला देण्यात येणार आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे वेळापत्रक ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे. अध्यक्षांकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसार दोन्ही गटांचे आमदार आणि बाजू मांडणारे वकील हे आता पुढील रणनीती ठरवणार आहेत.
या वेळापत्रकानुसार 6 ऑक्टोबर 2023 रोजी याचिकाकर्ते असलेल्या मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे 23 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रावर एकनाथ शिंदे गटाचे वकील त्यांचे उत्तर वा म्हणणे दाखल करतील. 13 ऑक्टोबर रोजी अपात्रतेबाबतच्या सगळ्या याचिकांची सुनावणी एकत्र व्हावी, अशी मागणी करणार्या ‘मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या’ अर्जावर आणि 23 सप्टेंबर रोजीच्या ‘मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या’ अतिरिक्त युक्तिवाद व कागदपत्रे रेकॉर्डवर आणणार्या अर्जावर दोन्ही पक्षांना आपले लेखी म्हणणे मांडावे लागेल व त्यावर युक्तिवाद होईल. 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या काळात अपात्रता सुनावणीबाबत विधानसभा सचिवालयात दाखल असलेल्या कागदपत्रांची, आदेशांची पाहणी करण्यासाठी, कागदपत्रे शोधण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वकिलांना संधी देण्यात येईल. थोडक्यात हा कालावधी केवळ अधिकृतरीत्या कागदपत्रे पाहणी करण्यासाठी असेल. 20 ऑक्टोबर रोजी अपात्रतेबाबतच्या सगळ्या याचिकांची सुनावणी एकत्र व्हावी, तसेच अतिरिक्त युक्तिवाद व कागदपत्रे रेकॉर्डवर आणण्याची मागणी करणार्या अर्जांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय जाहीर करतील. म्हणजे 24 ऑक्टोबरच्या दसरा सणापूर्वी पहिला महत्त्वाचा निर्णय
येणार आहे.
27 ऑक्टोबर रोजी तोपर्यंत दाखल झालेल्या कागदपत्रांपैकी कोणती कागदपत्रे स्वीकारायची व कोणती नाकारायची यावर दोन्ही पक्षांना आपापले म्हणणे सादर करावे लागेल. म्हणजे यादिवशी काही कामकाज होणार नाही, तर केवळ लेखी म्हणणे सादर करण्याची कार्यालयीन प्रक्रिया होईल. 6 नोव्हेंबर रोजी अपात्रतेबाबत निर्णय घेताना काय मुद्दे विचारात घेतले पाहिजेत यावर दोन्ही पक्षांनी आपले लेखी म्हणणे सादर करावे लागणार आहे. एकमेकांना त्याच्या प्रती द्याव्या लागणार आहेत. 10 नोव्हेंबर रोजी अपात्रतेबाबत निर्णय घेताना कोणते मुद्दे विचारात घेतले पाहिजेत यासाठी विधानसभा अध्यक्ष दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकतील. दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशीच हा युक्तिवाद होईल. दिवाळी सण 15 नोव्हेंबरला संपल्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी प्राथमिक तपासणी घेण्यासाठी दोन्ही पक्षांना त्यांच्या साक्षीदारांची यादी व प्रतिज्ञापत्र दाखल करावी लागणार आहे. यादिवशीही इतर काहीही न होता केवळ प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 23 नोव्हेंबरपासून उलट-तपासणी सुरू होईल आणि आवश्यकतेनुसार तसेच दोन्ही पक्षांच्या वकिलांच्या सोयीनुसार तारखा देण्यात येतील. सगळ्या आमदारांचे म्हणणे-पुरावे ऐकून घेण्याची सर्व प्रक्रिया संपल्यावर दोन आठवड्यानंतर म्हणजेच डिसेंबर महिन्यातील तारीख अंतिम सुनावणीसाठी ठरवली जाईल. वरील वेळापत्रक कुणाचीही विशेष अडचण नसल्यास व कुणी सुनावणी तहकुबीचा अर्ज न दिल्यास शक्यतोवर ठरलेल्या तारखानुसार पार पाडली जाईल व तारखांमध्ये काही बदल झाल्यास वकिलांना कळवले जाईल, असे विधानसभा सचिवालयाने विधानसभा अध्यक्षांच्या सहीने कळवण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांकडून जाहीर झालेल्या या वेळापत्रकावर टीका करताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले की, साक्ष आणि तपासणी हे फक्त वेळ घालवण्यासाठी आहेत. सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. सगळ्या आमदारांचा मुद्दा सारखा आहे त्यामुळे वेगवेगळी सुनावणी घेण्याची गरज नाही. सध्या केवळ वेळकाढूपणाचे धोरण सुरू असून त्यांनी निष्पक्षपातीपणे काम करावे, अशी अपेक्षा आहे. एका महिन्यामध्ये अपात्रता प्रकरण
संपले पाहिजे.
नार्वेकर परदेश दौर्यावर
आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू होण्याच्या काही दिवस आधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एक आठवड्याच्या परदेश दौर्यावर जाणार आहेत. 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत घाना या देशात पार पडणार्या 66व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस ते हजेरी लावणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह राहुल नार्वेकर या दौर्यावर जाणार आहेत. जगातील विविध देशांतील संसद व विधीमंडळ प्रमुख परिषदेत सामील होणार आहेत. जागतिक संसदीय व राजकीय प्रश्नावर या परिषदेत विचारमंथन होणार आहे.