नवी दिल्ली – दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार परिसरात काल झालेल्या स्फोटामागे खलिस्तान समर्थक गट असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. कारण तपासादरम्यान टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका चॅनलवर अशाच घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यात आले आहे. या संदर्भात दिल्ली पोलिसांनी टेलिग्रामला पत्र लिहून विचारणा केली आहे.
रोहिणीच्या सेक्टर १४ मधील सीआरपीएफ शाळेजवळ काल सकाळी स्फोट झाला होता. त्याची चौकशी सध्या एनआयएकडून केली जात आहे. स्फोट झाल्यानंतर टेलिग्रामवर ज्या चॅनेलवर व्हिडिओ शेअर करण्यात आला, त्या चॅनेलची सविस्तर माहिती एनआयएने मागवली आहे.
रोहिणीचे पोलीस उपायुक्त अमित गोयल यांना या संदर्भात विचारले असता, या टप्प्यांवर काहीही सांगणे शक्य नाही. तपास अद्याप पूर्ण झालेला नाही,असे मोघम उत्तर दिले.