नवी दिल्ली – देशात सध्या जवळजवळ रोजच एखाद्या विमानात बॉम्ब असल्याचे इशारे मिळत आहेत. आजही दिल्लीहून बेंगळुरु ला जाणाऱ्या अकासा एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना मिळाल्यानंतर विमान पुन्हा दिल्लीला वळवण्यात आले.दिल्लीहून बंगळुरुकडे जाणाऱ्या अकासा एअरलाईन्सच्या क्यूपी १३३५ या विमानाने आज सकाळी दिल्लीहून उड्डाण केले. या विमानात १७४ प्रवासी, तीन बालके व ७ कर्मचारी होते. या विमानात बॉम्ब असल्याची माहिती वैमानिकाला मिळाल्यानंतर त्यांनी हे विमान पुन्हा नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या उतरवले. सुरक्षा मानकांनुसार या विमानाची तपासणी करण्यात आली. विमानाला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असून सर्व प्रवासी व कर्मचारी सुरक्षित असल्याचे विमानकंपनीने सांगितले.