नवी दिल्ली – राजधानी नवी दिल्लीसह नोएडा, गुरुग्राम या लगतच्या शहरांमध्ये काल पासून सुरु झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जागोजागी प्रचंड वाहतूक कोंडी झाली.नवी दिल्लीच्या परिसरात झालेल्या पावसामुळे अनेक महामार्गही पाण्याखाली गेले आहेत. दिल्ली एनसीआर मध्ये रस्त्यांवर पाणी साचले. नोएडामधील अनेक सेक्टरमध्ये पाणी भरले. त्यामुळे लोकांना आपल्या घराच्या बाहेर पडणेही शक्य झाले नाही. अनेक रस्त्यांवरही पाणीच पाणी झाले. डीएनडी, कालिंदी कुंज, चिल्ला बॉर्डर या भागातही रस्त्यावर पाणी जमा झाले. सेक्टर ६३ च्या औद्योगिक क्षेत्रात पाणी भरल्यामुळे अनेक कारखान्यांना सुटी देण्यात आली. गुरुग्राममध्ये झालेल्या पावसाने अनेक रस्ते पाण्याखाली गेले . त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नरसिंहपूर येथील महामार्गालगतचा रस्ता पाण्याखाली गेला . त्यामुळे डोला ते राजीव गांधी चौक दरम्यान वाहनांच्या ८ किलोमिटरपर्यंत रांगा लागल्या. दिल्लीसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागातही जोरदार पाऊस झाला.