नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला पाठिंबा देण्याचा निर्णय समाजवादी पार्टीने घेतला आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काल ही घोषणा केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस ऐवजी आपला पाठिंबा दिल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, जो कोणी भाजपाला हरवेल त्याला सपाचा पाठिंबा आहे! सपाच्या घोषणेमुळे काँग्रेसच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. अखिलेश यादव यांनी गेल्यावर्षी दिल्लीच्या त्यागराज स्टेडिअममध्ये झालेल्या आपच्या महिला अदालत या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी आपला पुन्हा एकदा संधी मिळाली पाहिजे असे विधान त्यांनी केले होते. त्याचवेळी पूर्ण जबाबदारीने आपच्या सोबत असल्याचे त्यांनी म्हटले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने सर्व मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात स्वतः राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल उभे राहणार असून काँग्रेसने त्यांच्या विरोधात संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे.