नवी दिल्ली –
दिल्ली आणि नोएडासह एनसीआर भागात कोसळलेल्या पावसामुळे आज पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे अनेक भागात वाहतुक कोंडी झाली होती. दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वेवरदेखील पाणी साचले होते. नोएडामध्येही मुसळधार शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यमुना नदी आणि तिची उपनदी हिंडन नदीला आलेल्या पुरामुळे नोएडा येथील सुतियाना गावात डपिंग यार्डात उभ्या असलेल्या 350 कार अक्षरश: पाण्यात बुडाल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हवामान विभागाने २८ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुसळधार पावसामुळे खजुरी खास, करवल नगर, साबोली, मंडोली, एनएच-९ जवळील आयपी एक्स्टेंशन, राजगड एक्स्टेंशन, कृष्णा नगर यासह अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. तर मयूर विहार, लोहा पूल आणि खजुरी पुष्टा येथील मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागला.
हवामान विभागाने पुढील तीन दिवस २२ हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर पश्चिम भारत ते ईशान्य आणि दक्षिण भारत राज्यांचा समावेश आहे. आज मध्य महाराष्ट्र, पूर्व गुजरात, कोकण, गोवा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे.