नवी दिल्ली
दिल्लीत गेल्या दोन दिवसांत प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे. आज सकाळी ७ वाजता शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक २९० होता. शनिवारी ३१९, शुक्रवारी ४०५ आणि गुरुवारी ४१९ नोंद अशी हवा गुणवत्ता निर्देशांकांची नोंद झाली होती. आता शहरांमधील बांधकाम आणि ट्रकच्या प्रवेशावरील बंदी उठवण्यात आली आहे. शाळाही उद्यापासून पुन्हा सुरू होत आहेत. प्रदूषणामुळे सरकारने ८ नोव्हेंबर रोजी शाळांना १० दिवसांची हिवाळी सुट्टी जाहीर केली होती.
प्रदूषण कमी होत असल्याचे पाहून,ग्रेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन १४ दिवसांनी दिल्लीतून हटवण्यात आला आहे. ५ नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. ‘गेल्या दोन दिवसांत दिल्लीतील प्रदूषणाची पातळी सुधारली आहे. ग्रेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. परंतु मी दिल्लीतील लोकांना सतर्क राहण्याची विनंती करतो. ट्रकच्या प्रवेशावरील बंदी उठवण्यात आली आहे, बीएस-३ पेट्रोल आणि बीएस-४ डिझेल वाहनांवरील बंदी अजूनही लागू आहे. दिवाळीपूर्वी पावसाने दिलासा दिला होता, पण सणासुदीच्या दिवसांत लोकांनी फटाके फोडून पुन्हा हवा खराब केली. मात्र, आता हवेत थोडी सुधारणा झाली आहे. पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली आहे. दिवाळीनंतर हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतला जाईल. हवेची स्थिती बिघडल्यास, सम-विषम योजना सुरू केली जाईल’, असे दिल्लीचे पर्यावरण मंत्री आणि आप नेते गोपाल राय म्हणाले.