नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज दिल्लीत निवडणूक लढण्याची घोषणा केली. तसेच पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.
आज दिल्लीत खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार , प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक झाली. त्यानंतर राष्टवादी कॉंग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अजित पवार म्हणाले की, ” आम्ही महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये यश मिळवले आहे. नागालँड मध्ये पक्षाचा उपाध्यक्ष आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादीचे ३ आमदार निवडून आले आहेत. आतापर्यंत ३ राज्यांत यश मिळाले आहे. पुढे अजून यश प्राप्त करायचे आहे. आता दिल्लीतदेखील निवडणूक लढायची आहे. येथेही आम्ही नक्कीच खाते उघडू. पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवून द्यायचा आहे. डिसेंबरनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे ) राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्या आधी जे बदल करायचे आहेत, ते नक्की करू. युवक आणि महिलांना आपण संधी दिली जाईल. लोकसभेला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र कार्यकर्ता हरला नाही. कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेबाबत पवार म्हणाले की, कोण कुठल्या पदासाठी आग्रही आहे, या चर्चेला काहीही अर्थ नाही. राज्यात महायुती सरकार आणण्याचे लक्ष्य आम्ही पूर्ण केले आहे. एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह घेतील तो निर्णय मान्य असेल, असे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निकाल जाहीर झाल्यानंतर याबाबत जाहीर केले होते की, भाजपा व त्यांचे नेते जो व्यक्ती ठरवतील त्या नेत्याला आम्ही मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देऊ.