नवी दिल्ली – देशभरात रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत असातना राजधानी दिल्लीतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.येथील एका खासगी रुग्णालयात दोन किशोरवयीन मुलांनी उपचाराच्या बहाण्याने रुग्णालयात येऊन डॉक्टरची गोळ्या घालून हत्या केली.
दिल्लीच्या जैतपूर परिसराती नीमा रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास १६-१७ वर्षे वयाचे दोन अल्पवयीन तरूण नीमा रुग्णालयात आले. त्यांच्यापैकी एकाच्या पायाला बँडेज होते. ते बदलायचे आहे असे त्यांनी सांगितले. परिचारिकांनी त्याचे बँडेज बदलले. त्यानंतर ते दोघे थेट डॉ.जावेद अख्तर यांच्या केबीनमध्ये शिरले आणि त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडल्या. यात डॉ. अख्तर यांचा जागीच मृत्यू झाला.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे १ ऑक्टोबर रोजीदेखील रुग्णालयात उपचाराच्या बहाण्याने येऊन गेले होते. तेव्हा त्यांनी रुग्णालयात रेकी केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.या प्रकरणाचा दिल्ली पोलीस आणि फोरेन्सिक तज्ज्ञांमार्फत सखोल चौकशी सुरू आहे.