नवी दिल्ली – केंद्रीय अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर केले जाणार आहे. त्याच्या एक आठवडा आधी आज नवी दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात हलवा समारंभ आयोजित करण्यात आला होता. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते अर्थसंकल्पाची छपाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना हलवा देण्यात आला.केंद्रीय अर्थसंकल्पाला अंतिम रूप दिल्यानंतर हा हलवा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमानंतर अर्थ मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी हे अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात करतात. या काळात त्यांना आपल्या घरीही जाता येत नाही. त्याचप्रमाणे कोणाशीही संपर्क ठेवता येत नाही. अर्थसंकल्पाच्या छपाईसाठी नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात एक विशेष छपाई प्रणालीही स्थापन करण्यात आली आहे. आज हा कार्यक्रम झाल्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प पूर्ण झाला असून त्याची छपाई सुरू झाली आहे, हे निश्चित झाले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री लोकसभेत व अर्थराज्यमंत्री राज्यसभेत हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये अर्थसंकल्पपूर्व हलवा समारंभ
