नाशिक- दिंडोरी तालुक्यात तापमान घसरून थंडी वाढत चालल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. बदलत्या वातावरणामुळे द्राक्षबागांवर भुरी, लालकोळी व पिंकबेरी या किटाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
दिंडोरी तालुक्यात द्राक्ष बागा बहरू लागल्या आहेत. थॉमसन, सोनाका, काळी पर्पल याबरोबर विविध जातीचे द्राक्ष उत्पादन होत आहे.मात्र बदलत्या हवामानात उत्पादकांची काळजी वाढविली आहे.त्यामुळे व्यापारी वर्गाकडून चाचपणी सुरू आहे.गुजरात राजस्थान,उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाता व इतर राज्यातील व्यापारी या तालुक्यातील द्राक्षे घाऊक खरेदी करत असतात.मात्र सध्या द्राक्षामध्ये साखर भरणीस अटकाव,द्राक्षमण्यांचा रंग बदलणे आदी प्रतिकूल परिस्थितीला द्राक्ष उत्पादकांना सामोरे जावे लागत आहे.काही दिवसांपूर्वी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडल्याने द्राक्षे चिरली गेली आहेत. त्यातच थंडीही वाढत चालली आहे.त्यामुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.