दाना चक्रीवादळाचा वेग मंदावला पूर्वतयारीमुळे जिवीतहानी नाही

कोलकाता – अंदमान जवळील समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या दाना चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम बंगाल, ओडिशासह ७ राज्यांना बसला. विविध राज्यातील प्रशासनांनी केलेल्या पूर्वतयारीमुळे व एनडीआरएफच्या तत्परतेमुळे या वादळात जिवीतहानीचे वृत्त नसले तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.ओडीशातील केंद्रपारा जिल्ह्यातील भितरकनिका आणि भद्रक जिल्ह्यातील धामरामध्ये ११० किमी प्रतितास वेगाने वारे वाहिले. या चक्रीवादळामुळे ओडिशात मुसळधार पाऊस पडला. राज्यातील ५ लाख ८४ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. या वादळामुळे शेजारील ७ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. पश्चिम बंगालमधील १ लाख ५९ हजार लोकांना मदत शिबिरामध्ये हलवण्यात आलेले आहे. या चक्रीवादळामुळे कोलकाता व भुवनेश्वर येथील विमानतळे आज सकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. या भागातील रेल्वेच्या ५५२ गाड्या रद्द करण्यात आल्या. ओडिशात राष्ट्रीय व राज्य आपत्ती निवारण दलाच्या २८८ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून १४ जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. चक्रीवादळचा प्रभाव पश्चिम बंगाल, ओडिशा बरोबरच आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार, तामिळनाडू या राज्यांनाही बसला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top