मुंबई – अजित पवार आणि सुप्रिया सुळे, सुप्रिया सुळे यांची कन्या आणि अजित पवारांचा पुत्र पार्थ यांचे रक्षाबंधनाचे हसरे फोटो महाराष्ट्र सतत पाहत आला आहे. पवार कुटुंबांचा एकत्रित साजरा होणारा दिवाळी सण पाहून मराठी मन सुखावत होते. पण यावेळी सत्तेच्या
स्पर्धेत ही नाती तुटली. शेवटी सर्व तकलादूच असते का? हा प्रश्न आज समस्त लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ या दोघांना पडला. सुप्रिया सुळेंनी दिंडोरीत इतर भावांना राखी बांधली आणि अजित पवार मुंबईत इतर बहिणींकडून राख्या बांधून घेत राहिले. दोघांनी आजच्या दिवशी एक पाऊल मागे घेतले नाही.
पवार कुटुंबाची ही तर्हा होती तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या भावना गवळी यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना राखी बांधली. एकेकाळी शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका करणार्या सुषमा अंधारे यांनी आज उध्दव ठाकरे यांना राखी बांधली.राजकारणामुळे गेली अनेक दशके एकमेकांच्या विरोधात टोकाची टीका करणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता राजकारणाच्या दबावामुळे एकत्र आले असून, पंकजाने आज धनंजय मुंडे यांना राखी बांधली.
याच राजकारणाने आज दादा आणि ताईला दूर केले. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवार आज मुंबईत होते. तर सुप्रिया सुळे नाशिक दौर्यावर होत्या. ना अजित पवार राखी बांधून घेण्यासाठी नाशिकला गेले ना सुप्रिया सुळे त्यांना राखी बांधण्यासाठी मुंबईला आल्या. आज अजित पवार यांना सुप्रिया सुळेंकडून राखी बांधून घेण्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ज्या बहिणी इथे उपलब्ध असतील त्यांच्याकडून मी राखी बांधून घेईन. तर तिकडे नाशिकमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, जे कोणी भाऊ माझ्याकडे येतील त्यांचे मी स्वागतच करीन. ‘अतिथी देवो भव’ ही मला लहानपणापासून मिळालेली शिकवण आहे. सुप्रिया सुळे यांनी आज दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधली.
मुंबईत भाषण करताना अजित पवार म्हणाले की, बहिणीशी नाते दृढ करण्याचा रक्षाबंधनाचा सण आहे. ज्या प्रेमाने तुम्ही राखी बांधली त्याच प्रेमाने भाऊ म्हणून तुमचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे.
काका शरद पवार यांच्याशी बंड करून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यापासून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नात्यात कटुता आली आहे. लोकसभा निवडणुकीत तर अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे केले. त्यामुळे कटुता अधिकच वाढली. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी भावजय सुनेत्रा पवार यांचा सुमारे दीड लाख मतांच्या फरकाने पराभव केला.
त्यानंतर चर्चा सुरू झाली मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांनी ‘लाडकी बहीण’च्या प्रसाराचा धडाका लावला. ‘लाडकी बहीण’च्या प्रचाराचा धडाका सुरू असतानाच या योजनेवर विरोधकांकडून टीकेचा भडिमार सुरू झाला. योगायोगाने रक्षाबंधनाचा सणही याच दरम्यान आला आणि अजित पवार यांच्या बहिणीचा अर्थात सुप्रिया सुळे यांचा मुद्दा मीडियामध्ये चर्चेत आला.