हैद्राबाद
दाक्षिणात्य दिग्गज अभिनेते सरथ बाबू यांचे आज निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महिनाभरापासून ते आजारी होते. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांच्यावर हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
सरथ बाबू हे दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांचा चाहतावर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आहे. सरथ हे सेप्सिस या आजाराने त्रस्त आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना २० एप्रिल रोजी बेंगळुरूहून हैदराबादला आणण्यात आले. सरथ यांचा जन्म ३१ जुलै १९५१ रोजी आंध्र प्रदेशातील अमदलावलसा येथे झाला. त्यांनी १९७३ मध्ये ‘राम राज्यम’ या चित्रपटातून सिनसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर क्रिमिनल, उठी पुक्कल, आणि शिर्डी साई यांसारख्या हिट चित्रपटांच्या माध्यामातुन ते लोकप्रिय झाले. २०१७ च्या ‘मलयान’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा तामिळनाडू राज्य पुरस्कारही देण्यात आला. ते मुख्यत्वे तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमधील कामासाठी ओळखले जायचे. तसेच त्यांनी काही कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. त्यांना ९ वेळा सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा नंदी पुरस्कार मिळाला होता.