सातारा- दहिवडी परिसरात पावसाचा थेंबही न पडता काल दहिवडी-जुना फलटण रस्ता पाण्याखाली गेला.पाऊस न पडता चार ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. माणच्या पश्चिमेकडील तेलदर्यासह अनेक गावात काल पहाटे दोन तास ढगफुटीसद़ृश पाऊस झाला होता.या पावसाचे पाणी आंधळी नदीपात्रात आल्याने माणगंगा नदीला पूर आला होता आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली होती.
तीन महिन्यांपूर्वी जिहे-कठापूर योजनेचा शुभारंभ झाल्याने कृष्णा नदीचे पाणी प्रथमच आंधळी धरणात आले आहे. याच पाण्यातून माणगंगा नदी प्रवाही करण्यात आली आहे. नदीला अचानक पाणी वाढल्याने आंधळी व बिदाल ते पांगरी रस्त्यावरील पूल, दहिवडीतील जुना फलटण रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले. नदीला मोठा पूर आल्याने कित्येक तास या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प होती.