जालना- दलित, मुस्लीम आणि मराठा यांची एकजूट झाल्याची घोषणा आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केली. 75 वर्षांनंतर अशी सत्तापरिवर्तनाची लाट आली आहे. एकजुटीने आम्ही सत्ताधाऱ्यांचा सुफडासाफ करू, असा एल्गार जरांगे यांनी केला. कोणत्याही परिस्थितीत ही संधी सोडू नका. कारण आता संधी गमावली तर पुढील 75 वर्षांत तुम्हाला अशी संधी पुन्हा लाभणार नाही, असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले. कोणत्या मतदारसंघात आम्ही कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार याची घोषणा रविवार 3 नोव्हेंबर रोजी केली जाईल, असेही जरांगे यांनी सांगितले.
आज अंतरवाली सराटी येथे जरांगे यांची मुस्लीम आणि बौध्द धर्मगुरुंशी सुमारे दोन तास चर्चा झाली. यावेळी आनंदराज आंबेडकर उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसिध्दी माध्यमांना जरांगे यांनी बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, आजची बैठक ही सत्तापरिवर्तनासाठी होती. दलित, मुस्लीम, मराठा आणि सर्वच समाजातील वंचितांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी एकजुटीने मतदान करण्याचा निर्णय या बैठकीत बहुमताने नव्हे तर एकमताने घेण्यात आला. ज्या मतदारसंघात आम्ही उमेदवाराचे नाव जाहीर करू त्या मतदारसंघात त्याला सर्वांचा पाठिंबा राहील. उमेदवारी अर्ज भरलेल्या आमच्या अन्य सहकाऱ्यांना आम्ही अर्ज मागे घ्यायला सांगू. असे उमेदवार मग आम्ही निश्चित केलेल्या उमेदवाराचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील. मराठा समाजाला गुलामगिरीतून बाहेर पडण्याचे आवाहन करताना जरांगे म्हणाले की, अनेक सत्ताधारी आले आणि गेले, पण कोणालाही गरिबांसाठी, शोषित आणि वंचितांसाठी काही करावे असे वाटले नाही. वर्षानुवर्षे वीज, पाणी, शिक्षण आणि नोकरी याच विषयांवर निवडणुका लढविल्या आणि जिंकल्या. पण आपल्याला प्रत्यक्षात काहीही मिळालेले नाही. वीज नाही, पाणी नाही, शिक्षण नाही आणि रोजगाराच्या संधी नाहीत. वर्षानुवर्षे आम्ही ही गुलामगिरी सहन केली. पण आता आमची सहनशक्ती संपली आहे. आता मराठा समाजाने गुलामगिरीच्या बेड्या तोडून स्वतंत्रपणे जगले पाहीजे.
आपली पुढील वाटचाल कशी असेल याची रुपरेषा जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केली. आमची एकजूट ही सर्व धर्म जातींचा आदर करणारी असेल. कोणाच्या धर्मात ढवळाढवळ करायची नाही हे आमचे सूत्र राहील. प्रत्येकाने आपापल्या धर्माचा, जातीचा अभिमान बाळगावा. परंतु त्याच वेळी दुसऱ्याच्या धर्माबद्दल आदर बाळगावा. लोकशाही मार्गाने वाटचाल करायची, कोणाशीही दादागिरी करायची नाही आणि कोणाची दादागिरी सहनही करायची नाही या भूमिकेवर आम्ही ठाम राहू. आमची एकजूट ही केवळ दलित, मुस्लिम आणि मराठा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. लिंगायत, महानुभ पंथ आणि मायक्रो ओबीसी समाजाचा आमच्या एकजुटीमध्ये समावेश असेल.एका बाजूला प्रस्थापित सत्ताधारी आणि दुसऱ्या बाजूला गरीब, शोषित, वंचित अशी ही आरपारची लढाई असेल, असे जरांगे म्हणाले.
भाजपाचा ‘माधव‘ फॉर्म्युला
राजकारणात भाजपा पक्षाचा प्रवेश झाला तेव्हा ते ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. यामुळेच त्यांना निवडणुकीत यश मिळत नव्हता. फक्त ब्राह्मणांच्या मतांवर निवडणूक जिंकणे अशक्य होते. त्याचवेळी काँग्रेस मात्र मराठा समाज जवळ करून भरघोस यश मिळवित होता. हे लक्षात आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी मराठा सोडून इतर जातींना पाठिंबा देत आपल्याकडे वळविण्याची रणनीती आखली. यातूनच ‘माधव‘ पॅटर्नचा जन्म झाला. माधव म्हणजे माळी, धनगर, वंजारी समाज, या समाजाच्या नेत्यांना भाजपाने महत्त्वाचे स्थान देऊन त्यांची मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयोग सुरू केला. माळी समाजाचे ना. स. फरांदे, धनगर समाजाचे अण्णा डांगे आणि वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे यांना भाजपाने मोठे केले. त्यांच्यामुळे भाजपाला बहुजन समाजाचा पाठिंबा मिळू लागला आणि मतेही मिळू लागली. ‘माधव’ पॅटर्न महाराष्ट्रात प्रसिध्द झाला. आता जरांगे-पाटील त्याच पध्दतीने मुस्लीम, दलित आणि मराठा यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत.