मुंबई – तिबेटचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरू दलाई लामा हे पुढील महिन्यात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत श्रीलंका आणि थायलंडचे पंतप्रधानही असणार आहेत.पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या ‘धम्म दीक्षा’ या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत ते सर्वजण सहभागी होणार आहेत.१५ डिसेंबर रोजी वरळी स्पोर्ट्स स्टेडियम आणि १६ डिसेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे ही परिषद होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.
केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की, डॉ.बीआर आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर मुंबईत धम्म दीक्षा परिषद आयोजित करण्याची योजना आखली होती,परंतु त्याचवर्षी ६ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.मात्र आंबेडकरांचे ते स्वप्न यंदा मुंबईत पूर्ण होणार आहे.दलाई लामा यांच्याशिवाय श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने, थायलंडच्या पंतप्रधान श्रेथा थाविसिन, भूतानची राजकुमारी केसांग वांगमो वांगचुक आणि कंबोडिया, व्हिएतनाम,थायलंड आणि इतर देशांतील बौद्ध नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.तरी या कार्यक्रमाला बौद्ध व आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
दलाई लामा डिसेंबरमध्ये मुंबई दौर्यावर येणार!
