मुंबई- आयआयटी मुंबईचा विद्यार्थी दर्शन सोलंकीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या अरमान खत्रीला विशेष न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या कॉलेज सुरू असल्याने सहविद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदविण्यास उशीर होत आहे. त्यामुळे अरमानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी,अशी विनंती एसआयटीने न्यायालयाला केली.
एसआयटीचे वकील म्हणाले की, ‘आम्हाला अरमानच्या मोबाइलचा एफएसएल रिपोर्ट मिळाला आहे. त्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार दर्शनने अरमानची माफी मागितल्याची माहिती समोर आली. ‘अरमान, मला माफ कर, मी मुंबई सोडून जात आहे,’ असा मेसेज दर्शनने अरमानला पाठवला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस महासंचालकांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच सहविद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदविण्यास उशीर होत असल्याने अरमानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी. अरमान खत्रीचे वकील दिनेश गुप्ता यांनी सुनावणीत एसआयटीच्या विनंतीला विरोध केला. दिनेश गुप्ता म्हणाले की, ‘आधीच सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रिमांड अर्जात नवीन काही नाही. अरमान सराईत गुन्हेगार नाही. तो तपासाला सहकार्य करत आहे.
युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अरमानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर अरमानच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यावर लवकरच सुनावणी घेण्यात येईल.
दर्शन सोलंकी आत्महत्यप्रकरणी अरमान खत्रीला 14 दिवसांची कोठडी
