सेओल- दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक योल यांनी देशात लावलेला मार्शल लॉ केवळ सहा तासांतच मागे घेतला आहे. विरोधी पक्ष व सामान्य नागरिकांच्या जोरदार विरोधामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. आता राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात महाभियोग चालविण्याचा प्रयत्न आहे .
दक्षिण कोरिया येथील स्थानिक वेळेनुसार काल रात्री अकरा वाजता राष्ट्राध्यक्षांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात मार्शल लॉ लावण्याची घोषणा केली. त्यानंतर पुढील काही तासातच विरोधी पक्षांनी लोकांना रस्त्यावर येऊन मार्शल लॉला विरोध करण्याचे आवाहन केले. त्यानुसार दक्षिण कोरियाच्या संसदेबाहरे लाखो लोकांचा समुदाय एकत्र आला. याचवेळी विरोधी पक्षाचे खासदारही संसदेत आले. सैन्याने त्यांना विरोध केला असता त्यांनी बॅरिकेड तोडून संसदेत प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षांनी तातडीची बैठक बोलावली व मार्शल लॉ हटवण्याची मागणी केली. दक्षिण कोरियाच्या नॅशनल असेंब्लीमध्येही विशेष अधिवेशन होत मार्शल लॉच्या विरोधात मतदान घेण्यात आले. ३०० संसद सदस्यांपैकी १९० सदस्यांनी मार्शल लॉच्या विरोधात मत दिले. राष्ट्राध्यक्षांच्या पीपल्स पॉवर पक्षानेही त्यांना विरोध केला.
राष्ट्राध्यक्षांनी मार्शल लॉ जारी केल्यानंतर लष्कर जनरल अन सू यांना लॉ कमांडर म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी तातडीने सर्व प्रकारच्या राजकीय हालचाली व आंदोलनावर बंदी घातली. मात्र जनता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जागोजागी लोकांनी लष्कराच्या गाड्या अडवल्या. देशातील या स्थितीमुळे अखेर राष्ट्राध्यक्षांनी मार्शल लॉ मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी सैन्यालाही रस्यांवरुन दूर होण्याचे आदेश दिले. दक्षिण कोरियातील मार्शल लॉ मागे घेण्याच्या निर्णयाचे अमेरिकेनेही स्वागत केले आहे.