सोल- दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष यून सुक-योल यांना आज पोलिसांनी अटक केली. योल यांनी ३ डिसेंबर रोजी देशात आणीबाणी लागू केली होती, त्यानंतर संसदेत फक्त ३ तासांनंतर मार्शल लॉ रद्द करण्यात आला. त्यानंतर १४ डिसेंबर २०२४ रोजी संसदेत त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणून त्यांना पदावरून हटवले होते. याप्रकरणी महाभियोगाची सुनावणी काल सर्वोच्च न्यायालयात होणार होती, परंतु योल कोर्टात हजर न राहिल्याने आज सकाळी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. पोलीस योल यांना अटक करण्यासाठी आले तेव्हा योलच्या सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना रोखण्यासाठी बॅरिकेड उभारले होते. त्यानंतर योल यांना अटक करण्यासाठी शिडीचा वापर करून पोलिसांनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांना अटक केली. काल योल कोर्टात हजर न राहिल्याने त्यांना अटक होणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे काल रात्रीपासून त्यांच्या घराबाहेर योल समर्थक आंदोलक जमू लागले होते.
दक्षिण कोरियाच्या पदच्युत राष्ट्राध्यक्षांना अटक
