बँकॉक – हत्तींची आंघोळ सुरु असताना त्याने केलेल्या हल्ल्यात एका पर्यटक तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना थायलंडमध्ये घडली. ब्लांका ओजनगुरेन ग्रॅशिया असे तिचे नाव आहे. यावेळी त्या महिलेचा मित्रही उपस्थित होता. थायलंडच्या पेंगाँग येथील कोह यो प्राणीसंग्रहालयात ही दुर्घटना घडली.
आंतरराष्ट्रीय कायद्याची विद्यार्थिनी असलेली ब्लांका आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर थायलंडमध्ये फिरायला गेली होती. यावेळी प्राणिसंग्रहालयात हत्तींना आंघोळ घातली जात होती. त्यावेळी एकूण ८ पर्यटक उपस्थित होते. त्यात २३ वर्षीय ब्लांकाही होती. हत्तींवर पाणी उडवत असताना एका हत्तीच्या सोंडेचा जोरदार फटका तिला बसला. त्यात ती जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालया दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्राणिसंग्रहालयाने या संदर्भात अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.