त्रिपुरा – त्रिपुरात एचआयव्हीची लागण झाल्यामुळे ४७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून राज्यात अशी लागण झालेले तब्बल ८२८ विद्यार्थी आतापर्यंत आढळले असल्याची खळबळजनक माहिती त्रिपुरा एड्स नियंत्रण सोसायटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लागण झालेल्या ८२८ विद्यार्थ्यांपैकी ५७२ विद्यार्थी घरीच आहेत.तर अनेक विद्यार्थी प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी त्रिपुराबाहेर निघून गेले आहेत.
एड्स कंट्रोल सोसायटीने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये याबाबत तपासणी केली होती,यात इंजेक्शनद्वारे अंमली पदार्थांचे सेवन करत असलेली मुले शोधण्यात आली.रोज किमान ५ ते ७ एचआयव्ही बाधित झालेली प्रकरणे समोर येत असल्याची धक्कादायक माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.या प्रकरणांत अचानक झालेल्या वाढीमागे अंमली पदार्थांचे सेवन हेच प्रमुख कारण आहे.तसेच ज्या मुलांना लागण झाली आहे त्यातील बहुतेक मुले ही श्रीमंत कुटुंबांतील आहेत, यातील अनेक मुलांचे आई आणि वडील दोघेही सरकारी सेवेत आहेत. आपले मूल अंमली पदार्थाच्या आहारी गेले आहे, हे त्यांना कळते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.