त्याग आणि समर्पणाच्या कार्याची दखल आप्पा स्वारींना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मानउष्माघाताने 8 जणांचा मृत्यू

नवी मुंबई – लाखो श्री सेवकांच्या साक्षीने आज ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आप्पा स्वारींचा गौरव करताना अमित शहा म्हणाले की, त्याग आणि समर्पणाच्या कार्यातून मिळालेला हा सन्मान आहे तर आप्पा स्वारी यांनी आपल्या भाषणात श्री सेवकांचे आभार मानत हा आपल्या सर्वांच्या कार्याचा गौरव असल्याचे म्हटले. आप्पा स्वारींनी पुरस्काराचे 25 लाख रुपये मुख्यमंत्री निधीला दिल्याचे जाहीर केले आणि पावसाळा सुरू होताच प्रत्येकाने पाच झाडे लावण्याचा संदेश दिला.
खारघरचे सेंट्रल पार्क मैदान श्री भक्‍तांनी फुलले होते. अतिभव्य असा हा लाखोंचा जनसागर अप्पा स्वारींच्या दर्शनासाठी लोटला होता. काल रात्रीपासूनच श्री भक्‍त मैदानात येऊ लागले होते. सकाळपासून तळपत्या उन्हातही सर्व शांत बसून श्रवण करीत होते. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अतिशय सुगंधी अशा चाफ्याच्या हाराने आप्पा स्वारींचे स्वागत गृहमंत्री अमित शहांनी केले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रास्ताविक करताना म्हटले की, आप्पास्वारींचा निरूपणाचा भक्‍तीसागर पाहून मी धन्य झालो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार धन्य झाला. इतके ऊन असूनही श्री सेवक असे बसले आहेत जणू कोजागिरीच्या चांदण्यात बसले आहेत. हात पाहून भविष्य सांगणारे अनेक आहेत, पण आप्पासाहेब हाताला काम देऊन भविष्य घडवितात.
गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते आप्पा स्वारींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर श्री भक्‍तांनी त्यांना दहा फूट लांब गुलाबाचा पुष्पहार अर्पण केला. ढोलताशा, झांजा आणि टाळ्यांच्या कडकडाटात पुरस्कार सोहळा झाल्यानंतर सचिनदादा आपल्या भाषणात म्हणाले की, हा पुरस्कार देऊन सरकारने आमच्या कार्याचा सन्मान केला. मन, मानव व मानवता यावर सचिनदादांनी निरूपण केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात म्हटले की, जगात सात आश्‍चर्य आहेत आणि इथे जमलेले श्री सेवक हे आठवे आश्‍चर्य आहे. नानासाहेब व आप्पासाहेबांचे विचार घेऊन तुम्ही जगता. त्यामुळे तुमच्याइतके श्रीमंत कुणीच नाही. मन स्वच्छ करण्याची कला आप्पा स्वारींच्या निरूपणात आहे. महाराजांच्या काळात गोविंद शांडिल्य हे धर्मजागृतीचे काम करीत होते. त्यांना ‘धर्माधिकारी’ नावाने सन्मानित केले. तेव्हापासून हे कार्य सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः श्री भक्‍त आहेत. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री म्हणून आपल्यासमोर उभा नाही तर आपल्या परिवारातील श्रीभक्‍त म्हणून उभा आहे. या राज्याच्या बारा कोटी जनतेच्या वतीने मी आप्पासाहेबांचे अभिनंदन करतो. अमित भाई इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. सूर्य सकाळपासून आग ओकत असताना एकही श्री सदस्य उठत नाही ही आप्पा स्वारींची ताकद आहे. माझी पत्नी आणि श्रीकांत श्री सदस्यात बसले आहेत. इथे लहान मोठे कुणी नाही. राजकीय अधिष्ठानाला अध्यात्मिक अधिष्ठान लागते, त्याचे हे रूप आहे. मला आप्पा साहेबांच्या रूपात देव दिसतो. या देशाची सेवा केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे धन्यवाद मानतो. माझ्यावर डोंगर कोसळला तेव्हा आप्पासाहेबांनी दिशा दाखवली हे मी कधी विसरू शकणार नाही. आप्पासाहेब हे माणूस घडविण्याचे विद्यापीठ आहे.
गृहमंत्री अमित शहा सुरुवातीलाच म्हणाले की, आप्पासाहेबांचा सन्मान करण्यासाठी केवळ मी दिल्लीहून खास आलो आहे. समाजसेवा करणार्‍यांसाठी इतकेजण आलेले मी यापूर्वी कधी बघितले नाही. असा सन्मान केवळ त्याग आणि समर्पणातून निर्माण होतो. समाजसेवेचे संस्कार तीन पिढ्यांत राहिलेले मी प्रथमच बघितले. महाराष्ट्र शासनाने योग्य सन्मान केल्याने सरकारला टाळ्यांच्या गजराने धन्यवाद दिले पाहिजे. शौर्य, भक्‍ती आणि सामाजिक चेतना या भूमीतून निर्माण झाले. नानासाहेब व आप्पासाहेबांनी सामाजिक चेतना
प्रज्वलित ठेवली.
आप्पासाहेब धर्माधिकारींनी निवेदन सुरू केले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणाले की, गृह आणि सहकार खाते सांभाळत असूनही ते आज आपल्या सर्वांसाठी इथे आले हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. हा कार्याचा गौरव आहे. याचे श्रेय आपणा सर्वांना जाते. एका घरात दोनवेळा महाराष्ट्र भूषण देणे हे सरकारचे मोठे कौतुक आहे. नानांनी खेड्यापासून कार्य सुरू केले. गावातल्या लोकांना चांगले वळण लागले पाहिजे हा हेतू होता. प्रसिद्धीपासून आपण लांब आहे. मानवता धर्म अंतःकरणात रूजू व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे. माझ्या अखेरच्या श्‍वासापर्यंत मी हे कार्य सुरू ठेवणार आहे. माझा उत्तराधिकारी सचिन यानेही कार्य सुरू ठेवावे. कार्य श्रेष्ठ आहे म्हणून या देहाचा सन्मान आहे. आई-वडील, देश, समाज यांचे ऋण फेडण्यासाठी अखंड सेवा केली पाहिजे. समाजसेवा ही श्रेष्ठ आहे. आपण आनंद मिळविण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे. पाऊस आला की, प्रत्येकाने पाच झाडे लावावी आणि त्यांची निगा ठेवावी.
एखादे झाड रूजले की, ते स्वतः वाढते, वृक्ष हवा शुद्ध करतात. सुदृढ आरोग्य जगता यावे यासाठी आपण जी आरोग्य शिबिरे घेतो तिथे जावे. त्याप्रमाणेच रक्‍तदान करावे. समाजाने सर्व प्रकाराने सेवा केली तर देश मोठा होईल. थॅलेसेमियाची शिबिरे घेऊ तेव्हा उपस्थित राहायला हवे. कमी ऐकू येते त्यांना यंत्र वाटप, सरकारी दाखले मिळवून देणे, पाणपोई आणखी बांधा, अजून बस थांबे बांधायचे आहेत, बंधारे बांधून पाणी जिरवा अशा प्रकारच्या अनेक सेवा आपण करतो. समाजसेवेसह अंतःकरण स्वच्छ ठेवले पाहिजे. सामर्थ्य मिळविण्यासाठी आशीर्वाद उपयोगाचा नाही, आशिर्वादावर अवलंबून राहता कामा नये. अंतःकरणातील विचारांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मनाला ज्या विचारांची टोचणी असते त्या विचारांचा त्याग करायला हवा.
अत्यंत दुर्दैवी घटना घडली
उष्माघाताने 8 जणांचा मृत्यू

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. मात्र भरदुपारी 42 अंश तापमानात आयोजित केलेल्या या सोहळ्यात उष्माघातामुळे जवळजवळ 300 लोकांना त्रास झाला. त्यापैकी 50 लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. आणखी 15 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विट करून या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तसेच याला सरकार जबाबदार असल्याने सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
दुपारी उन्हाच्या तीव्रतेमुळे 300 हून अधिक जणांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आणि त्यांना चक्कर येऊ लागली. अनेकांना उलट्या झाल्या. हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. काहींना भोवळ आली. डिहायड्रेशन झाले. त्यामुळे काहींना नजिकच्याच एमजीएम रुग्णालयात आणि टाटा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच संध्याकाळनंतर काही जणांची प्रकृती खालावली आणि त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला. याबाबत अतुल लोंढे यांनी ट्विट केले आणि यात 10 जण दगावल्याची माहिती दिली. दरम्यान या घटनेची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने रात्री 8 वाजता एमजीएम रुग्णालयात धाव घेतली आणि डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली. उष्माघात झालेल्या सर्वांवर उच्च प्रतीचे उपचार करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ही अत्यंत वेदनादायी दु:खद घटना असून, या दुर्घटनेत सात ते आठ जणांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेणार्‍या श्री सेवकांच्या सहाय्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या एका उपायुक्ताची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top