मुंबई – महायुतीला आश्चर्यकारक असे निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे मतमोजणीच्या दुसर्याच दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे सर्वांनाच वाटत होते. मात्र हा निर्णय प्रदीर्घकाळ रेंगाळल्याने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी अडून राहिले आहेत, अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद नाकारले तर त्यांना केंद्रात मंत्रिपद, त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रिपद, शिंदे गटाला गृहमंत्रालय असे अनेक पर्याय चर्चेला येत होते. मात्र आज अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. एकनाथ शिंदे यांनी आपली तलवार म्यान करून भाजपाचे केंद्रातील ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोेदी आणि अमित शहा हे जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल असे जाहीर केले. यानंतर उद्या दिल्लीत अमित शहा यांच्याशी तीनही नेत्यांची बैठक होऊन देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर होईल असे जवळजवळ निश्चित झाले आहे.
उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मागितल्यानंतर याच मुद्यावर भाजपा-शिवसेना युती तोडण्यात आली आणि महाराष्ट्राने अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण पाहिले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि भाजपाबरोबर जाऊन सरकार स्थापन केले. आता एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद दिल्यानंतर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यास भाजपाने नकार दिला असून भाजपाचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात सत्तेवर येईल हे उघड झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे देणार्या भाजपा पक्षाने उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास का नकार दिला? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
आज सायंकाळी आपल्या ठाण्याच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आजवर केलेल्या कामाची माहिती दिली आणि अखेरीस आपण मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वावर सोडला असल्याचे जाहीर केले. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला मतदारांचे आभार मानले. त्यानंतर ते म्हणाले की, महायुतीवर जो विश्वास दाखविला, जो विकास आम्ही केला. कल्याणकारी योजना आणल्या त्याचा हा विजय आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम केले. मी एक साधा कार्यकर्ता म्हणून काम केले. मी स्वत:ला मुख्यमंत्री कधीच समजलो नाही. मी निश्चय केला होता की, सामान्य माणसासाठी काम करायचे. मी गरिबी पाहिली त्यामुळे मला अधिकार मिळाले की सामान्यांसाठी काम करायचे हे मी ठरवले होते.
मोदी व शहांचे पूर्ण पाठबळ आम्हाला होते. अडीच वर्षे ते पूर्ण ताकदीने माझ्यामागे उभे होते. आम्ही फुटलो तेव्हाही ते म्हणाले होते की, आम्ही तुमच्या पाठीशी राहू. माझ्या कारकिर्दीबाबत मी समाधानी आहे. आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतले. जो मतांचा वर्षाव झाला तो आम्ही केलेल्या कामामुळे झाला. लाडका भाऊ अशी माझी ओळख झाली.
आम्ही नाराज नाही. आम्ही रडणारे नाही. माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी जनतेच्या भल्यासाठीच काम करीन. जनतेतील मुख्यमंत्री म्हणून माझी ओळख झाली. मी ताणून धरलेले नाही.
काल पंतप्रधान मोदींना फोन केला आणि सांगितले की, सरकार बनवताना माझ्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही निर्णय घ्या तो निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. मी अमित शहा यांनाही फोन करून हेच सांगितले. महायुती म्हणून पुन्हा काम करायचे आहे. वरिष्ठ जो निर्णय मुख्यमंत्री पदाबाबत घेतील त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. कोंडी, अडसर, नाराजी नाही. उद्या तीनही पक्षांची अमित शहांकडे बैठक आहे त्यात चर्चा होऊन निर्णय होईल.
एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद झाल्यानंतर पाचच मिनिटांत नागपुरात भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, एकनाथ शिदेंसारख्या कर्तबगार व्यक्तीबद्दल वावड्या उठवत होते. आज शिंदेंनी स्पष्टपणे त्यांची भूमिका स्पष्ट केली की, मोदी आणि शहा जो निर्णय घेतील त्याला त्यांचा व शिवसेनेचा पाठिंबा राहील. यामुळे विरोधकांच्या वावड्या या वावड्याच राहिल्या. हिंदुत्त्वाची भूमिका घेऊन राज्यात शिवशाही आणली. राज्य विकसित करण्यासाठी फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. देवेंद्रजींच्या काळातील प्रकल्प पूर्ण केले. महायुती अभेद्य आहे. आमचे नेतृत्व म्हणाले ते एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले.
शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद ऐकली. आम्ही तिन्ही नेते उद्या दिल्लीला जाणार आहोत आणि आमची चर्चा होईल. नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची निवड होणार आहे. त्यानंतर नागपूरचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. पुरवण्या मागण्या मंजूर करुन घ्यायच्या आहेत. आमच्यावर कामाचे प्रचंड ताण असणार आहे. मात्र आम्ही अनुभवी असल्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आमचा केंद्र सरकारकडून निधी आणण्याचा प्रयत्न असणार आहे. दिल्लीत लोकसभेचे अधिवेशन सुरू असून माझा प्रमुखांचा भेट घेण्याचा प्रयत्न असेल. उद्या होणार्या बैठकीत मंत्रिमंडळाला अंतिम स्वरुप मिळणार आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या वाटेला येणार्या मंत्रिपदाबाबत निर्णय शिंदेंच घेतील. तसाच नियम आम्हालाच लागू होतो. कार्यकर्त्यांना काही वाटले तरी संख्याबळ किती आहे, यावर निर्णय होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी राजकीय परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीने खराब कामगिरी केली. त्यावेळी आम्ही पराभव मान्य केला. मात्र विरोधी पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना आणि पराभूत उमेदवारांना काही तरी करुन दाखवायचे असल्यामुळे ते ईव्हीएम मशीनचे खापर फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.