हैदराबाद- तेलंगणा सरकारने ‘मेयोनीज’ वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.’मेयोनीज’ खाल्ल्याने
लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सरकारचे मत आहे. आरोग्य मंत्री दामोदर राजनरसिंह यांनी अन्न सुरक्षा आयुक्त आर.व्ही कर्णन यांना यासंदर्भात आवश्यक आदेश जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्र्यांनी हैदराबाद येथील आरोग्यश्री ट्रस्ट कार्यालयात अन्न सुरक्षेचा आढावा घेतला तेव्हा हा निर्णय दिला .
हैदराबादच्या नंदीनगरमध्ये ‘मोमोज’ खाल्ल्याने अनेक लोक आजारी पडल्याच्या घटनेची माहिती मंत्र्यांनी घेतली. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा सल्ला यावेळी अधिकाऱ्यांना दिला. विविध प्रकारच्या अन्नामध्ये भेसळयुक्त मेयोनिज मिसळले जाते. प्रामुख्याने ‘मोमोज’ खाताना मेयोनीजचा वापर केला जातो. हे न उकडलेल्या अंड्यापासून बनवले जात असून त्याचा लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना सांगितले.ते म्हणाले की, मेयोनिजचा दर्जा आणि ते खाल्ल्यानंतर होणाऱ्या दुषपरिणामांबाबत डझनभर तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर जीएचएमसी टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी २३५ हॉटेल्, वसतिगृहे, रस्त्यावरील स्टॉल आणि गोदामांची तपासणी केली. १७० आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहे. जिल्ह्यातही सर्वंकष पाहणी करावी अशी सूचना मंत्र्यांनी केली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन टास्क फोर्स समित्या नेमण्याची सूचना करण्यात आली आहे.