मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी रीघ लागलेली असताना महाराष्ट्रातील अख्खा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षच त्यांच्या पक्षात विलीन होणार आहे. येत्या 6 ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षाच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांची ही मोठी खेळी असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकांपूर्वी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी गाड्यांचा ताफा आणत महाराष्ट्रात वाजतगाजत आपला पक्ष ‘लाँच’ केला होता. नागपुरातील शाखेचे केसीआर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर विविध पक्षांतील नाराजांनी बीआरएसचा झेंडा हाती घेतला होता. लोकसभा निवडणुकीत या पक्षामुळे प्रस्थापित पक्षांना मोठा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु तेलंगणातील सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष असलेल्या बीआरएसची लोकसभेबरोबर तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही पिछेहाट झाली. त्यामुळे त्याला तेलंगणातील 10 वर्षांची सत्ता गमवावी लागली. त्यानंतर महाराष्ट्रातील बीआरएसला काही भवितव्य उरले नव्हते. अखेरीस महाराष्ट्र शाखेने शरद पवार यांच्या शाखेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील बीआरएसच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत पवारांच्या उपस्थितीत 6 ऑक्टोबरला सर्व पदाधिकार्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे ठरले आहे. याबाबत पक्षाचे महासचिव हिमांशू तिवारी ’नवाकाळ’शी बोलताना म्हणाले की, पक्षाला गळती लागली आहे हे मान्य आहे. इतर ही पक्षात आमचे पदाधिकारी जात आहेत. पण आम्ही काम करत राहू. महाराष्ट्रात बीआरएसची फारशी ताकद नसली तरी मराठवाड्यात शरद पवारांच्या पक्षाला थोडाफार फायदा होऊ शकतो. बीआरएसचे काही नेते, पदाधिकारी पवार गटाच्या चिन्हावर विधानसर्भर्ंां निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यताही बोलून दाखवली जात आहे. मात्र, याबाबत पवार यांच्या पक्षाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.