तू शाहरूखचा मुलगा हाच दोष ठरला आयपीएस अधिकार्‍याचे धक्कादायक पत्र

मुंबई – सुपरस्टार शाहरूख खानचा पुत्र आर्यन खानला खंडणी व प्रसिध्दीसाठी अटक केली, असे आता आयपीएस अधिकारी अभिनव कुमार यांच्यासारख्या उच्च पदस्थ पोलीस अधिकार्‍याने जाहीर पत्रातच म्हटल्याने आणखी खळबळ उडाली आहे. त्यांनी आर्यन खानला लिहिलेले हे पत्र व्हायरल झाले आहे. यामुळे अंमली पदार्थ विरोधी कायदा व धाडींवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकप्रकरणाचे वेगवेगळे पैलू दररोज समोर येत आहेत. समीर वानखेडेंनी आर्यनला सोडवण्यासाठी लाच घेतल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता याच प्रकरणी एका आयपीएस अधिकार्‍याने एका वृत्तपत्रातील सदरातून आर्यनला लिहिलेले जाहीर पत्र चर्चेत आले आहे. आर्यन आणि त्याच्या कुटुंबाला या प्रकरणात नाहक त्रास झाल्याबद्दल आयपीएस अधिकारी अभिनव कुमार यांनी त्याची जाहीर माफी मागितली आहे. या पत्रातून अंमली पदार्थांसंबंधीची सेलिब्रिटींची प्रकरणे आणि ती हाताळणारी पोलीस आणि अन्य कायदेशीर यंत्रणा यांच्यातल्या पळवाटा समोर आल्या आहेत. वानखेडेंच्या चौकशीतले कच्चे दुवे उघड करणारे अनेक प्रश्न अभिनव कुमार यांनी उपस्थित केले आहेत. अंमली पदार्थ बाळगले हा नव्हे तर शाहरुखचा मुलगा आणि सेलिब्रिटी असणे हा तुझा दोष होता, असे ते म्हणाले.
‘डिअर आर्यन खान: अ पोलीस ऑफिसर्स अपॉलॉजी’ असे या सदराचे शिर्षक आहे. यात आयपीएस अधिकारी अभिनव कुमार यांनी आर्यन खानला जाहीर पत्र लिहिले आहे. ते लिहितात, ’तुला आणि तुझ्या कुटुंबाला झालेल्या आघाताबाबत मला खेद आहे. अंमली पदार्थविषयक कायद्यात व्यापक बदलांची गरज आहे. यासोबतच आपल्या देशातील कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या विविध संस्थांचे परीक्षण करण्यासाठी अधिक कठोर यंत्रणांची आवश्यकता आहे. जेणेकरून तुला आणि तुझ्या कुटुंबाला जो नाहक त्रास झाला त्यातून अन्य कुणाला जावे लागू नये.’
’गेल्या काही दिवसांपासून एनसीबी पूर्व क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्या विविध ठिकाणांवरील सीबीआयचे छापे मी पाहात आहे. मी स्वत: दोन किशोरवयीन मुलांचा बाप आहे. शिवाय एक सेवेत असणारा पोलीस अधिकारी आहे. या नात्याने ऑक्टोबर 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबावर आलेल्या परिस्थितीची चर्चा व्हायला हवी,’ असे ते पुढे लिहितात.
ते आर्यनला सांगतात, ’क्रूझ शिप कॉर्डेलियावर 2 ऑक्टोबर 2021 रोजी छापा मारण्यात आला. तुला आणि तुझ्या मित्रांना अटक झाली. सर्वांची झडती घेतली, अटक झाली, गंभीर आरोप लागले. एनडीपीएस कायद्यांतर्गत अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी तू 25 दिवस तुरुंगात होता. तुझ्यावर मीडिया ट्रायल सुरू होती. त्यावेळी आपल्या समाजाचा असंवेदनशील आणि
ईर्ष्येने भरलेला चेहराही समोर आला. आपल्या एकजुटीचा अभाव असलेल्या समाजातली विषमताही बाहेर पडली. तू निश्चितच दोषी होतास. पण ते अंमली पदार्थ बाळगले, तस्करी केली म्हणून नाही तर याहून मोठा अपराध तू केला होतास. तू बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा होतास. श्रीमंत होतास आणि सेलिब्रिटी होतास. हा तुझा दोष होता.’
पोलिसांत या प्रकरणाची काय चर्चा होती यावर भाष्य करताना अभिनव कुमार लिहितात, ’अवघ्या देशाचे लक्ष वेधणारे हे प्रकरण असल्याने देशातल्या पोलीस अधिकार्‍यांचीही रुची, उत्सुकता वाढवली होती. आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरही याची अनौपचारिक चर्चा व्हायची. माझे पोलीस मित्र आणि मलाही काही मूलभूत प्रश्न पडले होते. छाप्यात तुझ्याकडून आणि तुझ्या मित्राकडून हस्तगत केलेल्या ड्रग्जची एकूण मात्रा किती होती? सर्व आरोपींच्या चौकशीनंतर त्या सर्वांकडून ड्रग्ज हस्तगत केले का? तस्करीचा गंभीर आरोप लावल्यानंतर सर्व हस्तगत अंमली पदार्थांचे प्रमाण पुरेसे होते का? झडती आणि जप्ती मेमो एनडीपीएसच्या नियमांनुसार तयार केले होते का? इलेक्ट्रॉनिक मीडियात तर्कवितर्कांना ऊत आला होता. बॉलीवूडच्या कानाकोपर्‍यात आपले जाळे पसरवणार्‍या एका ड्रग कार्टेलच्या हिमनगाचे तुम्ही टोक आहात, अशी प्रत्येक वृत्तवाहिनीवर
चर्चा होती.’
वानखेडेंनी मॉडेल्स, सेलिब्रेटींना
खोट्या प्रकरणांमध्ये गोवले
मुनमुन धमेचाचे आरोप

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यासारख्या अनेक मॉडेल्स आणि सेलिब्रेटींना खोट्या प्रकरणात गोवले असा गंभीर आरोप मॉडेल मुनमुन धमेचा हिने केला आहे. दोन वर्षापूर्वी क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने मॉडेल मुनमुन धमेचा हिलादेखील अटक केली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर आता वानखेडे स्वतः याच केसमध्ये अडकल्यानंतर आता तिने वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. क्रूझ प्रकरणी काही काळाने आर्यन खानची सुटका झाली. पण त्यानंतरही मुनमुन धमेचा भीतीपोटी गप्प बसल्याचे सांगत, आता सीबीआयने वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा असल्याचे ती म्हणते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top