तू राहशील किंवा मी! ठाकरे बंधूंचे एक्झिट थक्क करणारा निकाल! विरोधक पूर्ण साफ

मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने आज महाराष्ट्राची जनताच एकत्रितपणे थक्क झाली. तीन ज्येष्ठ विरोधी पक्षांचा इतका दणदणीत पराभव कधी झाला नव्हता. 288 जागांपैकी महायुतीला 231 इतक्या प्रचंड जागांवर यश आले आणि मविआला केवळ 45 जागांवर विजय मिळवता आला. ‘जाणता राजा’ शरद पवारांच्या गटाला केवळ 10 जागांवर यश आले. शरद पवारांनी 87 उमेदवार उभे केले होते. इतकेच नव्हे तर मविआला 157 जागा मिळतील असे स्वत: जाहीर केले होते. त्यांची संपूर्ण रणनीती फेल गेली. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना सभांमध्ये ललकारत ‘तू राहशील किंवा मी राहीन’ असे आव्हान दिले होते. उद्धव ठाकरे गटाने 95 उमेदवार उभे केले त्यातील केवळ 20 विजयी झाले. राज ठाकरे यांचाही दारुण पराभव झाला. त्यामुळे ठाकरे बंधूंची एक्झिट झाली असे म्हणावे लागेल.
काँग्रेसला तर जनतेने सर्वात जबरदस्त फटका मारला. राहुल गांधी यांचे नेतृत्त्व जनतेत स्वीकारले जात असतानाच हा पराभव होणे हे पक्षाला घातक ठरणार आहे. कालपर्यंत 160 जागा मविआ जिंकणार अशी वल्गना करीत काँग्रेसने विजयी आमदारांना मुंबईत आणण्यासाठी विमाने तयार ठेवली, हॉटेलच्या रुम बूक केल्या. काँग्रेसने आग्रह करून 101 उमेदवार उभे केले, पण त्यांना केवळ 20 जागांवर यश आले. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बाळासाहेब थोरात, धीरज देशमुख (विलासराव देशमुखांचे पुत्र), यशोमती ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण असे दिग्गज पराभूत झाले.
मविआच्या घटक पक्षांचा मोठा पराभव झालाच, पण सत्तेची स्वप्न पाहणारे बविआ, मनसे, वंचित, तिसरी आघाडी यांनाही जनतेने झिडकारले.
महायुतीचा इतका प्रचंड विजय का झाला आणि मविआचा इतका दारुण पराभव का झाला याचे नेमके कारण सांगणे कुणालाही जमणार नाही. लाडकी बहीण योजनेने निश्‍चितपणे महायुतीची मते वाढवली. त्याचबरोबर मुस्लीम मौलवींनी उबाठा आणि काँग्रेसला पाठिंब्याची पत्रे काढल्याने दोन्ही पक्षांना त्याचा तोटाच झाला. तरीही इतके मताधिक्य कसे शक्य आहे? हा प्रश्‍न महाराष्ट्राची जनता एकमेकांना विचारत आहे. महायुती आणि मविआत अटीतटीचा सामना होईल अशीच जनतेत चर्चा होती. मविआला इतका फटका बसला यावर जनतेचाच विश्‍वास बसत नाही. आजचा निकाल पाहून जनताच थक्क झाली आहे. लाडक्या बहिणीच्या सुप्त लाटेने हा चमत्कार घडला का
हा प्रश्‍न आहे.
अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, लाडकी बहिणीचा अंडरकरंट आला आणि सर्वांना उताणे पाडले. असे यश माझ्या ऐकिवात नाही. या यशामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही जनतेच्या ऋणातच राहू. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. आम्हाला खूप काम करावे लागेल. पंतप्रधान मोदींवर जनतेने मोठा विश्‍वास दाखविला. एकनाथ शिंदे म्हणाले की, हा ऐतिहासिक दिवस आहे. जनतेने ही निवडणूक स्वत:च्या हाती घेतली. महायुतीवर प्रेमाचा वर्षाव केला. बहीण, भाऊ, शेतकरी सर्वांनीच महायुतीवर प्रेम दाखविले. आम्ही अडीच वर्षांत स्पीड ब्रेकर काढून विकास केला. अनेक कल्याणकारी योजना आणल्या. केंद्राने सहकार्य केले.

मुख्यमंत्री कोण होणार?
नवा मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्‍न देवेंद्र फडणवीस यांना विचारला तेव्हा ते म्हणाले की, कुणाचे किती आमदार आले यावर हा निर्णय अवलंबून नाही. आम्ही तिघे एकत्र बसून एकमताने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेऊ. याबाबत काहीही वाद होणार नाही.

निकाल अनाकलनीय, अनपेक्षित
उद्धव ठाकरेंची नाराजी व्यक्त

उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत म्हटले की, महाराष्ट्राचा निकाल अनाकलनीय आहे. याचे गुपित शोधावे लागेल. लाटेपेक्षा त्सुनामी आली असे दिसते. बेकारी, महिला असुरक्षित, महागाई, सोयाबीनला भाव नाही यासाठी हा निकाल दिला का? लाट उसळली असे नेमके कोणते काम त्यांनी केले आहे? आता त्यांनी शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी, लाडक्या बहिणीला 2100 रुपये या सर्व त्यांच्या योजना त्यांनी पूर्ण कराव्या. कोरोनाच्या काळात माझ्याबरोबर असणारा महाराष्ट्र माझ्याशी असा का वागला? लोकसभेत लागलेला निकाल चार महिन्यात बदलतो असे कोणते काम त्यांनी केले? लोक आमच्या सभांना गर्दी करीत होते. मोदी आणि अमित शहांच्या सभांवेळी खुर्च्या रिकाम्या होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top