छत्रपती संभाजीनगर – तिरुपतीच्या सुप्रसिध्द बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमध्ये जनावरांची चरबी असल्याच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला असताना आता तुळजापूरच्या तुळजा भवानी मंदिर संस्थानाने सावधगिरीचा उपाय म्हणून प्रसाद बनविण्यासाठी नामांकीत कंपन्यांना आमंत्रित केले आहे. संस्थानाने या कामासाठी खुल्या निविदा काढल्या आहेत.
प्रसादाचा खर्च एका वर्षाला अंदाजे ४ कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. तीन वर्षांसाठी हे कंत्राट नामांकीत कंपन्यांना दिले जाणार आहे. मंदिर संस्थानाचे अध्यक्ष आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बसे यांच्या पुढाकाराने प्रसादासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसादाचा दर्जा उच्च राखला गेला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. त्यासाठीच दर्जा आणि स्वच्छतेची हमी देऊ शकणाऱ्या कंपन्यांना प्रसाद बनविण्याचे कंत्राट दिले जाणार आहे.