अंकारा –
तुर्कीयेच्या संसदेत काल जोरदार हाणामारी होऊन खासदारांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही हाणामारी सुमारे ३० मिनिटे चालली. यात विरोधी पक्षाचे तीन खासदार जखमी झाले. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पीकरच्या व्यासपीठाच्या पायऱ्यांवर रक्तही दिसल्याने खळबळ उडाली आहे.
तुर्कीयेच्या संसदेत शुक्रवारी विशेष सत्राची बैठक होत होती. या बैठकीत खासदार काईन आटले यांच्याविषयी चर्चा सुरू होती. अटाले यांनी २०१३मध्ये एर्दोगान सरकारच्या विरोधात निदर्शने केली होती. त्यानंतर खूप हिंसाचार झाला होता. यानंतर आटले यांना अटक करण्यात आली. त्यानंतर २०१३ पासून तुरुंगात आहेत. त्यांना २०२२ मध्ये १८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेली निवडणूक लढवली होती. यात ते विजयी झाले होते. यानंतर एर्दोगन यांच्या पक्षाने अटाले यांचे संसदेचे सदस्यत्व नाकारणारे विधेयक आणून त्यांच्या संसदेतील प्रवेशाला अटकाव केला. या निर्णयाला न्यायालयात अपील करण्यात आले. १ ऑगस्ट रोजी तुर्कीयेच्या सर्वोच्च न्यायालयाने संसदेचा निर्णय रद्द केला. न्यायालयाने आटले यांना त्यांचे खासदार म्हणून सर्व अधिकार बहाल करत त्यांच्या सुटकेचे आदेश दिले.मात्र, आटले यांना केवळ ५ वर्षे तुरुंगाबोहर राहण्याची सवलत देण्यात आली असून मुदत संपल्यानंतर ते पुन्हा तुरुंगात जाणार आहेत.
या निर्णयावर संसदेत चर्चा सुरू असताना आटले यांच्या पक्षाचे नेते अहमद सिक म्हणाले, “सत्ताधारी पक्षाचे अनेक खासदार आटले यांना दहशतवादी म्हणतात. पण सर्वात मोठे दहशतवादी तुम्हीच आहात. तुमचा पक्ष दहशतवाद्यांचा पक्ष आहे.
त्यांच्या या विधानावरून संसदेत गदारोळ सुरू झाला. गोंधळामुळे संसदेचे कामकाज ठप्प झाले. तीन तासांहून अधिक विश्रांतीनंतर सत्र पुन्हा सुरू झाले. एर्दोगान यांच्या पक्षाविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल सभापतींनी विरोधी पक्षाचे नेत्यांना फटकारले. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या नेत्यांनाही खडसावले. भांडणात सहभागी असलेल्या दोन्ही खासदारांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.