अंकारा – तुर्कीच्या मुगला प्रांतात रविवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात दोन वैमानिक आणि एका डॉक्टरसह चार जणांचा मृत्यू झाला. मुगला गव्हर्नर अब्दुल्ला एरिन यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहिती नुसार ले की, दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर जवळच्या हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर कोसळले. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.
हेलिकॉप्टरने मुगला येथून अंताल्या शहरासाठी उड्डाण केले. या घटनेचा व्हिडिओ आणि अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या छायाचित्रांमध्ये हेलिकॉप्टरचा ढिगारा रुग्णालयाजवळ पसरलेला दिसत आहे. विमानातील लोकांव्यतिरिक्त या अपघातात इतर कोणालाही इजा झालेली नाही. घटनास्थळी लावलेल्या कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेह बाहेर काढले आणि पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले.याआधी ९ डिसेंबरला तुर्कस्तानमधील इस्पार्टा प्रांतात दोन लष्करी हेलिकॉप्टरच्या झालेल्या धडकेत ६ लष्करी जवान शहीद झाले होते. दैनंदिन ट्रेनिंग फ्लाइट दरम्यान हा अपघात झाला. मृतांमध्ये एका ब्रिगेडियर जनरलचाही समावेश आहे. हा अपघात कशामुळे झाला हे समजू शकलेले नाही.