अंकारा – तुर्कीच्या बोलू प्रांतातील कर्तलकाया शहरातील कर्तल हॉटेलमध्ये काल मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. ही आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस घेत आहेत.कर्तल या १२ मजली हॉटेलमध्ये काल मध्यरात्री साडेतीन वाजता ही आग लागली. या आगीत १० जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांचा मृत्यू जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या वरच्या मजल्यावरुन उडी मारल्यामुळे झाला. हॉटेलमधील अनेक जण चादरीचा वापर करुन वरच्या मजल्यावरुन सुखरुपपणे खाली उतरल्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये २३४ प्रवासी होते. आग लागल्याबरोबर जिन्याच्या परिसरात धूर झाल्यामुळे बाहेर पडण्याचा मार्गही सापडत नव्हता, अशी महिती एका प्रवाशाने दिली. अग्निशमन दलाच्या ३० बंबांनी ही आग विझवली असून दक्षता म्हणून शेजारच्या हॉटेलमधील लोकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
तुर्कीच्या हॉटेलमधील भीषण आगीत १० जणांचा मृत्यू
