अंकारा –
तुर्कस्थानची राजधानी असलेल्या अंकारा शहराला वादळाचा तडाखा बसला आहे. या वादळामुळे मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे. अंकारा मेट्रोपॉलिटन नगर पालिकेचे महापौर मन्सूर यावस यांनी ट्विटरवर रहिवाशांना वादळी वारा आणि पावसाबाबत इशारा दिला आणि आवश्यक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.
महापौरांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले, हवामान खात्याच्या माहितीनुसार अंकारामध्ये वाऱ्याचा वेग ७८ किमी प्रति तासावर नोंदवला गेला. महापौरांच्या ट्विटला उत्तर देताना एका व्यक्तीने म्हटले की, मी ५० वर्षाचा आहे आणि मी माझ्या आयुष्यात असे वादळ कधी पाहिले नाही. कित्येक लोकांनी सोशल मीडियावर या वादळाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तुर्कस्थानमध्ये आलेले वादळ किती भयानक होते, याची झलक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे. वादळाच्या व्हिडिओमध्ये एका इमारतीबाहेर फर्निचरदेखील आकाशात उडताना दिसते आहे.