इस्तंबूल- तुर्कस्तानमध्ये पुरातत्त्व संशोधकांना प्राचीन ग्रीक नाण्यांनी भरलेले एक भांडे सापडले आहे. ही सर्व नाणी सोन्याची आहेत. पश्चिम तुर्कीमधील नोशन नावाच्या प्राचीन ग्रीक शहरात एका घरातील जमिनीखाली असलेल्या खोलीत हे नाण्यांनी भरलेले भांडे सापडले आहे.
ही सोन्याची नाणी ग्रीक असली तरी त्यांच्यावर पर्शियन साम्राज्याचा छाप आहे.नोशनपासून ९७ किलोमीटरवर असलेल्या सार्डिस या ठिकाणच्या टांकसाळीत ही नाणी पाडलेली असावीत, असे संशोधकांचा अंदाज आहे. अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटीतील ख्रिस्तोफर रॅट्टे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.एखाद्या मर्यादित पुरातत्त्वीय उत्खननात इतका मौल्यवान शोध लागणे, ही एक दुर्मीळ बाब असल्याचे त्यांनी सांगितले. त्याकाळातील कुणी तरी सुरक्षेचा विचार करून ही सोन्याची नाणी पुरून ठेवलेली असावीत.काही पुराव्यांचा विचार करता ही नाणी इसवी सन पूर्व पाचव्या शतकात बनवलेली असावीत.गेल्या काही वर्षांच्या काळात याठिकाणी प्राचीन काळातील अनेक वस्तूंचा शोध लागला आहे. त्यामध्ये मातीच्या भांड्यांचा तसेच शस्त्रांचा समावेश आहे.या वस्तू अलेक्झांडर द ग्रेट याच्यानंतरच्या ‘हेलेनिस्टिक’ काळातील आहेत.