बार्सिलोना :
कोलंबियाची पॉप स्टार शकीराने बार्सिलोना येथे तिच्या कर फसवणुकीच्या खटल्याच्या पहिल्या दिवशी तुरुंगवास टाळण्यासाठी शेवटच्या क्षणी कबुली दिली. शकिराविरोधात २०१२ ते २०१४ दरम्यान स्पेनमध्ये १२.७ दशलक्ष डॉलर म्हणजेच १२३ कोटी रुपयांच्या कर फसवणुकीचा खटला सुरू असून शिक्षा टाळण्यासाठी तिने फिर्यादींसोबत करार केला. या प्रकरणात तडजोड म्हणून तिने ५० टक्के (६.४ दशलक्ष ) दंडाची रक्कम भरली. स्पेनच्या तपास अधिकार्यांनी शकिराला ८ वर्षांपर्यंत तुरुंगात टाकण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.
२०१२ ते २०१४ पर्यंत शकिराने स्पॅनिश रहिवासी म्हणून सहा महिन्यांहून अधिक काळ व्यतित केला. या काळात तिने कर भरणे अपेक्षित होते. परंतु तिने तो भरला नाही. पण तिने कर भरल्याचा खोटा दावा केला. ती स्पेनची रहिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी, फिर्यादीने ११७ साक्षीदारांना बोलावले होते. ज्यात केशभूषाकार, स्टुडिओ तंत्रज्ञ, नृत्य शिक्षक, डॉक्टर, ब्युटिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि तिचा ड्रायव्हर यांचा समावेश होता. शकिराचे हे कर फसवणूक प्रकरण २०१८ पासून चर्चेत आहे. शकीरा आणि तिची कायदेशीर टीम आतापर्यंत या आरोपांना खोटे असल्याचे सांगत होती. पण काल शकिराने दंड भरला.