कोल्हापूर – उबाठा नेते उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात अंबाबाईचे मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची पहिली सभा घेतली. या पहिल्याच सभेत त्यांनी घोषणा केली की, राज्यात मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सोय आहे. आता आम्ही सत्तेवर आलो तर राज्यातील मुलांना शिक्षण मोफत देणार आहोत. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधू. इतकेच नव्हे तर सुरतमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारून दाखवू. आमचे सरकार आल्यानंतर पुढची पाच वर्षे डाळ, तेल, साखर, तांदूळ या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू.
आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरला आले होते. या प्रचार सभेत काँग्रेसचे नेते सतेज पाटीलही उपस्थित होते. काल कोल्हापूरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सतेज पाटील यांना आपल्या जवळ बोलावले. त्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्यावर राधानगरी विधानसभा मतदारसंघातून के. पी. पाटील यांच्या विजयाची जबाबदारी देखील सोपवली.
उद्धव ठाकरे प्रचार सभेत म्हणाले की, लोकसभेच्यावेळी मी भाषणाची सुरुवात देशप्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो अशी करत होतो. दसरा मेळाव्यात मी हिंदू बांधवांनो अशी करतो, पण आताची ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशी आहे. महाराष्ट्रप्रेमी हे महाविकास आघाडीसोबत आहेत आणि मी लढायला मैदानात उतरलो आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हा महाराष्ट्र विकणार्यांना जो मदत करील तो महाराष्ट्राचा शत्रू होईल. जो कोणी अदानीला मदत करतोय, जो कोणी भाजपाला मदत करतोय, जो कोणी मोदी- शहांच्या पालख्या वाहतोय तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे हे मी जाहीरपणे सांगतो. राधानगरी मतदारसंघ गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही. मधल्या काळात ग्रहण लागले, त्यासाठी मी हात जोडून माफी मागतो. ती चूक माझ्याकडून झाली. ज्याला सगळे काही दिले त्यांनी गद्दारी केली. आता माझ्याच नव्हे तर जनतेच्याही पाठीत वार करून छातीतही वार करायला आपल्यासमोर ते उभे राहिले आहेत. सगळे देऊनसुद्धा शिवसेना नावाच्या आईवर वार करणारा तुमचा माणूस होऊ शकतो का?
ते पुढे म्हणाले की, ही निवडणूक महाराष्ट्राची ओळख ठरवणारी निवडणूक आहे. महाराष्ट्र कुणाचा? महाराष्ट्र शिवाजी महाराज, शाहु फुले, आंबेडकरांचा की, मोदी- शहांचा ही ओळख ठरवणारा ही निवडणूक आहे. एक भाऊ आला तर ठीक आहे, पण तीन तीन भाऊ येत आहेत. एका बाजूला देवा भाऊ , दुसरीकडे दाढी भाऊ, तिसरीकडे जॅकेट भाऊ. तुमचा भाऊ कोणता? हे सर्व खाऊ भाऊ आहेत. उद्या राहुल गांधी मुंबईत येत आहेत. आम्ही उद्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित करत आहोत. पण मी आजच सांगतो की, आज राज्यात सरकारी शाळांमध्ये मुलींना शिक्षण मोफत आहे. आता आम्ही मुलांनाही तेवढंच मोफत शिक्षण देणार आहोत. कारण, मुलगा आणि मुलगी माझ्या महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. महाराष्ट्र सरकार मुलींना मोफत उच्च शिक्षण देत आहे, मग मुलांनी काय गुन्हा केला आहे? आम्ही मुलांनाही मोफत शिक्षण देणार आहोत. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर महिलांना अनेकदा तक्रार कुठे करायची हेच कळत नाही. त्यामुळे मविआचे सरकार आल्यास राज्यात तातडीने महिला पोलिसांची भरती केली जाईल. राज्यात विविध ठिकाणी पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी कार्यरत असणारी विशेष पोलीस ठाणी सुरू
केली जातील.
ते पुढे म्हणाले की, आमचे सरकार आल्यास राज्यातील शेतकर्यांना हमीभाव दिला जाईल. महाविकास आघाडीचे सरकार पडले नसते तर यंदाच्या वर्षी शेतकरी कर्जमुक्त झाला असता. आता आम्ही सत्तेत नाही. उद्या सत्तेत आल्यानंतर पुन्हा शेतीमालाला हमीभाव दिला जाईल. जसे आपले मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा पाच वर्षांत पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. महागाई वाढू दिली नव्हती तसे आज मी जाहीर करतो की, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुढची पाच वर्षे डाळ, तेल, साखर, तांदूळ सारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण व्हायला पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला, पण तो पुतळा आठ महिन्यांतच कोसळला. ही तुमची छत्रपती शिवरायांबद्दल भक्ती आहे का? कोश्यारी राज्यपालपदी बसले होते, ते महाराजांच्या विरोधात बोलले. त्यांच्याविरोधात आपण मोर्चा काढला. भाजपाने, शिंदेंनी त्यांचा निषेध केला नाही. महाराजांचा अपमान केला तर काय झाले, माझा तर अपमान नाही ना केला, असे मोदी म्हणाले असतील. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे भव्य मंदिर उभारणार. सुरतलाही मंदिर उभारून दाखवीन. येताना तुमच्या सर्व नेत्यांना घेऊन या आणि महाराजांसमोर नाक घासा. ‘जय शिवराय’ हा आमचा जयघोष असेल. लोकसभा निवडणुकीवेळी आमच्या मशाल प्रचार गीतातील ‘जय भवानी’ शब्द काढण्याचा निर्णय तुम्ही दिलात. पण अद्याप तुम्ही माझ्यावर कोणतीही कारवाई करू शकला नाहीत. तुम्ही माझ्यावर कारवाई करा. मग संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर कारवाई करील. इंग्रजांना विरोध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. त्याच सुरतेमध्ये महाराष्ट्राच्या पाठीत वार करून तुम्ही गद्दार घेऊन गेला होता. त्याच सुरतमध्ये शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार आहे. 50 खोके घेऊन तुम्ही महाराष्ट्र विकत घेऊ शकत नाही. कितीही जन्म गेले तरी माझा महाराष्ट्र तुमच्या खोक्यात मावू शकणार नाही. हे सरकार टक्केवारीचे, खोके सरकार आहे.
दरम्यान, सायंकाळी उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये प्रचार सभा झाली. यावेळी त्यांनीकोल्हापूरच्या सभेतील मुद्यांचा पुर्नउच्चार केला. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करताना या उद्योगमंत्र्यांनी रत्नागिरीत एकतरी उद्योग आणला का? याचे उत्तर द्या. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही भावांनी पैशाची मस्ती दाखवली होती. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या,
असे सांगितले.