मुंबई – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी बारामती मतदारसंघातील पवार विरूध्द पवार संघर्षावर भाष्य करणारी दोन पत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्या पत्रांची फार चर्चा झाली. आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना अजित पवार समर्थकाचे असेच एक निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दादा तुम्ही माफी मागून मोकळे झालात. मात्र आम्ही शरद पवार यांच्या लेखी वाईट ठरलो, तुमच्यामुळे आम्ही दोन गटांत विभागलो, आम्ही कुणाची माफी मागायची अशी व्यथा या पत्रात व्यक्त केली आहे. हे पत्र आता चर्चेचा विषय ठरले आहे.
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही तशी चूक होऊ नये यासाठी अजित पवार सध्या आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा यांना उभे करणे ही चूक होती, अशी जाहीर कबुली अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत दिली. त्यानंतरही अनेकदा त्यांनी आपण कुटुंबात फूट पाडली ही चूक होती, अशी कबुली दिली. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या समर्थकाने आपल्या मनातील खदखद पत्रातून मांडली आहे.
हे पत्र लिहिणारी व्यक्ती कोण हे जरी स्पष्ट झाले नसले तरी पत्रातून मांडलेले मुद्दे अजित पवार यांना निश्चित विचार करायला लावणारे आहेत. स्वतःला अजित पवार यांचा निष्ठावंत म्हणविणारा हा कार्यकर्ता पत्रात म्हणतो की, दादा तुम्ही माफी मागून मोकळे झालात. त्याच्या सर्वत्र बातम्या झाल्या. पण या सगळ्या घडामोडींत आम्ही मात्र पवार साहेबांच्या लेखी वाईट ठरलो. आता आम्ही कोणाची माफी मागायची हेही एकदा सांगा. तुमच्यामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते दोन गटांत विभागले गेलो. आता आम्ही एकमेकाचे तोंडही बघत नाही. कामानिमित्त सहज बोललो किंवा निवांत गप्पा जरी मारल्या तरी आमच्यावर संशय घेतला जातो एवढे कलुषित वातावरण झाले आहे. अशावेळी तुम्ही माफी मागून चूक कबुल करून मोकळे झालात, आमची मात्र चांगलीच पंचाईत केली आहे.माफी मागून तुम्ही स्वार्थ साधला आणि आम्हाला वार्यावर सोडले अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात का येऊ नये?
पत्रात पुढे अजित पवार यांच्या भावनिक भाषणांवर शंका उपस्थित केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात तुम्ही आम्हाला नेहमी भावनिक होऊ नका असे सांगत होता. विकासाला महत्व द्या, भावनिक होऊन प्रश्न सुटणार नाहीत, असे वारंवार सांगत होता. मात्र आता तुम्हीच खूप भावूक होत आहात आणि आम्हालाही रडवता आहात. त्यामुळे तुम्हाला नेमके झाले तरी काय, तुम्ही एवढे घाबरून का गेला आहात, तुमचा आत्मविश्वास पहिल्यासारखा का दिसत नाही, तुम्ही कसल्यातरी ओझ्याखाली दबलेले आहात असे वातावरण का निर्माण झाले आहे, आमचे कणखर दादा आता आम्हाला कुठेच का दिसत नाहीत, कधी नव्हे ते तुम्ही एवढे हतबल का दिसत आहात असे अनेक प्रश्न मला आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना पडले आहेत.
पत्राचा समारोप अजित पवार यांच्या गुलाबी रंगाच्या प्रेमावर शंका घेत करण्यात आला आहे. दादा सध्या तुम्ही पिंक झाला आहात आणि तुमचे विचारही पिंक झाले आहेत का, असा खोचक प्रश्न संबंधित पत्रलेखकाने उपस्थित केला आहे. झाले गेले विसरून जाऊ आणि नव्या जोमाने कामाला लागूया. निराशेची जळमटे फेकून द्या.जिद्दीने उभे राहू. जिद्दीने लढू आणि बारामतीचा गड पुन्हा एकदा काबीज करू, असे आवाहनही पत्रलेखकाने केले आहे.
पत्रलेखक पुढे म्हणतो, तुमच्या बदललेल्या भूमिकेबद्दल आमच्या मनात निर्माण झालेला संभ्रम काल-परवाच्या तुमच्या बारामतीच्या सभेने अधिकच गडद केला आहे. सभेत तुम्ही भरभरून बोललात. मात्र तुमचा नेमका सूर कळला नाही. तुम्ही खदखद व्यक्त करीत आहात, सहानुभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहात, भावनिक कार्ड खेळत आहात, की मन मोकळे करीत आहात हेच आम्हाला समजले नाही. कारण आता तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा, रोखठोक आणि लढावू बाणा हरवला आहे की काय, अशी भीती वाटते.
‘तुझी ग्रामपंचायत आली का रे’ किंवा ‘माईक चालू राहू दे, आपलं सगळं उघड असतं’ असे जाहीरपणे सांगणारे आमचे कणखर दादा आम्हाला आता पहिल्यासारखे वाटत नाहीत. सध्या तुम्ही फार चिडचिड करता. राग, संताप व्यक्त करता. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून मी एकटाच नव्हे तर आपले सगळे जीवाभावाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जवळची सगळी मंडळी पुरती घाबरून गेली आहेत.कारण वहिनींच्या (सुनेत्रा पवार) पराभवाला तुम्ही सोडून आम्ही सगळेच जबाबदार आहोत अशी तुमची भावना झाली आहे. तुमच्या बोलण्यातून ते सतत जाणवते. तुमचे असे संशयाने पाहणे आता सहन होत नाही. जीवाची घालमेल होते.
बारामतीत आता मला रस नाही, मी तसा समाधानी आहे, झाकली मूठ सव्वा लाखाची, एवढी सगळी कामे करूनही बारामतीकर वेगळा निर्णय देऊ शकतात तर काय करणार, पिकते तिथे विकत नाही, तुम्हाला एक नवा आमदार मिळाला पाहिजे, मग त्याची माझी कारकीर्द बघा, शेवटी मीच निर्णय घेणार आहे, मला माझा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, अशाप्रकारची तुमची विधाने ऐकून मला तर धक्काच बसतो.अशा बोलण्यातून तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे हेच मला कळत नाही.तरीही तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य असेल.
आजपर्यंत तुमचे सगळे निर्णय मीच नव्हे तर आम्ही सगळ्यांनी वेळोवेळी मान्य केले आहेत. तुमच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहिलो आहोत. तुमच्या भूमिकेचा आदर केला आहे. एके दिवशी तुम्ही अचानक सरकारमध्ये सामील झालात. तेव्हा निधड्या छातीच्या दादांना गुवाहाटीला जाण्याची गरज नाही, असे म्हणत आम्ही तुमचे समर्थन केले. त्यावेळी सगळ्यांनी आम्हाला नमक हराम म्हटले. तरीही आम्ही मागे हटलो नाही. तुमच्यावर असलेल्या प्रेमापोटी गद्दारीचा शिक्का पाठीवर घेऊन लोकसभेला गावोगाव फिरलो. वहिनींचा प्रचार केला. पण वहिनींचा पराभव झाला आणि माझ्यासह अनेक कार्यकर्ते तुमच्यासाठी कुचकामी आणि गद्दार ठरलो याचे जास्त वाईट वाटते.
कसं, दादा म्हणतील तसं, हे ब्रिद घेऊन आजपर्यंत तुमच्यासाठी करीत आलो. तुम्ही सांगाल ते ऐकत आलो आहे. मात्र वहिनींचा पराभव तुमच्या जिव्हारी लागला आणि आपल्या नात्यात दुरावा आला. पण दादा लोकसभा निवडणुकीत मी प्रामाणिकपणे काम केले. गावोगावी प्रचार केला. तुमच्या विजयासाठी पायाला भिंगरी लावून फिरलो, हे तुम्हाला कसे पटवून देऊ हेच कळत नाही.
तुम्ही माफी मागून मोकळे झालात! आम्ही वाईट ठरलो अजित पवारांच्या कार्यकर्त्याचे पत्र व्हायरल झाले
