तुकाराम बीज सोहळ्यासाठी
देहूत भक्तांची मांदियाळी

देहू- संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठ गमन केलेला दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने मोठा सोहळा साजरा केला जातो. आज या सोहळ्याला सुरुवात झाली. या भव्यदिव्य सोहळ्यापूर्वी तुकोबारायांच्या पादुकांची आरती करण्यात आली. काही अंतरावर असलेल्या तुकारामांच्या वैकुंठ गमन मंदिरात पालखी काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते.
संत तुकारामांनी फाल्गुन वद्य द्वितीय या दिवशी सदेह वैकुंठ गमन केले. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्त देहू नगरीत आज ३७५ वी तुकाराम बीज आहे. याकरिता तुकारामांचे भक्तगण त्यांच्या दर्शनासाठी आले. तुकोबारायांनी ज्या स्थळावरून वैकुंठगमन केले त्या स्थळावर नांदुरकी नावाचा वृक्ष आहे. तुकाराम बीजेला दुपारी १२:०२ च्या सुमारास हा वृक्ष थरथरतो, याची अनुभूती वारकरी आणि भाविकांना येते, असे सांगितले जाते. त्यामुळे या वृक्षाकडे सर्वांचे लक्ष लागेलेले असते. वारकरी प्रामुख्याने शेतकरी वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. यंदा झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तुकोबारायांना साकडे घातले.

Scroll to Top