लंडन –
अर्भक हे आपल्या आई- वडिलांचे ‘डीएनए’ घेऊन जन्माला येते. परंतु ब्रिटनमध्ये प्रथमच तीन जणांचा डीएनएचा वापर करून बाळ जन्माला आले आहे. या बाळाला बहुतांशी डीएनए दोन पालकांकडून आणि ०.१ टक्के तिसऱ्या दात्या महिलेकडून मिळाले आहेत. माइटोकॉन्ड्रियल हा आजार घेऊन जन्माला येण्यापासून मुलांना वाचवण्यासाठी हे आद्य तंत्र समजले जात आहे.
आतापर्यंत इतर देशात अशी पाच मुले जन्माला आली आहेत, परंतु त्याचा तपशील जाहीर नाही. मायटोकॉन्ड्रिया हे शरीराच्या प्रत्येक पेशीमधील लहान कप्पे असतात. ते अन्नाचे वापरण्यायोग्य उर्जेमध्ये रूपांतर करतात. माइटोकॉन्ड्रियल दोष असणे हा असाध्य रोग असून जन्माच्या काही दिवसांत किंवा काही तासांतच बाळासाठी तो प्राणघातक ठरू शकतो. माइटोकॉन्ड्रियात दोष असल्यास ते शरीराला इंधन पुरवठा करू शकत नाही आणि मेंदूचे, स्नायू, हृदय यांचे नुकसान होते आणि अंधत्व येऊ शकते . या आजारामुळे अनेक मुले दगावली आहेत. याकरिता तिघांचा डीएनए घेण्याचा प्रयत्न करण्यात आला . या तंत्राकडे निरोगी मूल जन्माला घालण्याचा एकमेव पर्याय म्हणून पाहिले जात आहे.