तिसरी आघाडी न झाल्यास राज्यात सर्व जागा स्वबळावर लढवणार! राजरत्न आंबेडकरांचा निर्धार

मुंबई – बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू आणि प्रकाश आंबेडकर यांचे काका अशोक आंबेडकर यांचे पुत्र राजरत्न आंबेडकर आता सक्रिय राजकारणात उतरले आहेत. तळागाळातल्या आंबेडकरी जनतेशी संवाद साधून पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्याची चळवळ उभी करण्याचा राजरत्न यांचा प्रयत्न आहे. भारतीय बौद्ध महासभेचे ते अध्यक्ष आहेत. राजू शेट्टी, बच्चू कडू यांच्याबरोबर एकत्र येऊन तिसरी आघाडी करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नांना किती यश येईल, हे येणाऱ्या काळात ठरेल. ‘नवाकाळ’शी त्यांनी आपल्या ध्येयधोरणांविषयी केलेली बातचीत –

  • तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू म्हणून राजकीय वारसा तर तुमच्याकडे चालत आलेला आहे. आता सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहात. नेमका काय उद्देश आहे? राजरत्न – सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय हा आमचा आजचा आणि अचानक घेतलेला निर्णय नाही. २०१४ मध्ये संपूर्ण देशभर मी ‘संविधान बचाव देश बचाव संघर्ष समिती’च्या माध्यमातून संविधान कसे संकटात आहे, याविषयी जनजागृती केली होती. त्या वेळी लोक असा प्रश्न विचारायचे की, मग आम्ही मते कुणाला द्यायची ? आम्ही देशात मायावती व राज्यात प्रकाशजी असेच उत्तर द्यायचो. परंतु मागील दोन लोकसभा निवडणुकींमध्ये हे दोघेही मतांचे रूपांतर प्रतिनिधित्वामध्ये रूपांतरित करण्यात अपयशी ठरले अथवा त्यांची मानसिकता दिसली नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतला की लोकसभेच्या निकालानंतर सक्रिय राजकारणात उतरायचे. कारण आमच्या सामाजिक चळवळीचा फायदा हा केवळ आम्ही सक्रिय राजकारणात नसल्यामुळे इंडी आणि महाविकास आघाडीला होताना दिसत आहे.
    • रिपब्लिकन पक्षाचे आधीच इतके गट आहेत. त्यात तुम्ही आणखी एक गट स्थापन करताय का? या गटांनी एकत्र यावे, यासाठी प्रयत्न करणार का?
      राजरत्न -रिपब्लिकन पक्षाचे गट आता शिल्लक राहिलेले नाही. रामदास आठवले हे केवळ भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले नसून त्यांचा कायदेशीर उल्लेख संसदेच्या संकेतस्थळावर भाजपाचे सदस्य म्हणून होतो. त्यामुळे त्यांचा आणि रिपब्लिकन पार्टीचा काडीचाही संबंध येत नाही. कवाडे हे स्वतः वयोवृद्ध होऊन आता भाजपाचा प्रचार करताना दिसत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन विचारधारेशी आणि शब्दाशी कधीच फारकत घेतलेली आहे. बाबासाहेबांनी ३० सप्टेंबर १९५६ रोजी स्थापन केलेला पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धूळ खात पडलेला आहे. त्यामुळे मी नवीन पक्ष काढून तो चालवण्यापेक्षा बाबासाहेबांचा मूळ पक्ष उभा करण्याचा निर्णय मी घेतला. राहिला प्रश्न रिपब्लिकन नेत्यांच्या ऐक्याचा, तर जे नेते जागेवरच नाही अशा नेत्यांना एकत्र करण्याऐवजी मी रिपब्लिकन जनतेला एकत्रित करण्याचा निर्धार केला आहे.
  • तुम्ही बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्या बरोबर तिसऱ्या आघाडीसाठीही प्रयत्न करत आहात. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काय तयारी आहे?
    राजरत्न -आगामी निवडणुकांमध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागांवर मागील विधानसभेपासूनच आमच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. अशा काही जागांवर आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. भाजपा नेहमी आरक्षणाचा आणि सरकारी क्षेत्रांचा विरोध करत आहे. परंतु हास्यास्पद बाब अशी की, महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण देशात तीच भाजपा आरक्षित जागांवर आपले उमेदवार निवडून पाठवते. म्हणून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या जागांबाबत मूग गिळून गप्प बसणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात आम्ही समाजाचे खरे प्रतिनिधी विधानसभेत पाठवणार आहोत. महाराष्ट्रात आम्ही सर्व जागा लढवणार आहोत. तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न तर आहे, पण तो न जमल्यास आम्ही राज्यात सर्व जागा स्वबळावर लढणार आहोत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top